राज्य शासनाचा हट्ट मुलांच्या जीवावर!

15 जूनपासून शाळा सुरू करण्यास शिक्षक संघटनांचा विरोध

पुणे – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही राज्य शासनाने 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचा हट्ट धरला आहे. या हट्टापायी शासनाने विद्यार्थी, शिक्षक यांचा जीव धोक्‍यात घालू नये, असे म्हणत शिक्षक क्रांती संघटनेसह इतर संघटनांनी त्यास विरोध दर्शविला आहे.

करोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये मार्चपासून बंद आहेत. मुंबईत एका शाळेतील विद्यार्थ्याला करोनाची लागण झाल्याने शासनाचे डोळे उघडले होते. त्यानंतर दहावीच्या भूगोल पेपरची परीक्षा रद्द केली. इयत्ता पहिली ते नववी, अकरावीच्या परीक्षाही रद्द केल्या. शासनाच्या या निर्णयाचे संघटनांकडून त्यावेळी स्वागतच केले.

राज्यातील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. असे असूनही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही 15 जूनलाच शाळा सुरू करण्याचे वारंवार स्पष्ट संकेत दिले आहेत. सुरुवातीला ऑनलाइन वर्ग चालवण्याचे नियोजनही सुरू केले. मात्र, याला आता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांच्याकडून विरोध होत आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचा कोणताही विचार न घेता शिक्षण विभाग शाळा सुरू करण्याची एवढी घाई का करतेय असा प्रश्‍न राज्यातील जनतेला पडला आहे.

शिक्षक क्रांती संघटनेचे अध्यक्ष संभाजी शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांना निवेदनही पाठविले आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाचे सचिव प्रा. संतोष फाजगे, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा

मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्‍चंद्र गायकवाड यांनीही शाळा व कनिष्ठ महाविद्यालये लवकर सुरू करण्याचा विरोध दर्शविला आहे.

राज्यातील मराठी शाळांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. शिक्षकांना काम करूनही नियमित वेतन मिळत नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. केवळ राजकीय पुढारी, उद्योजक, व्यापारी या धनदांडग्यांच्या इंग्रजी शाळांच्या आग्रहामुळे राज्यातील सर्वच शाळा 15 जूनपासून सुरू करणे योग्य ठरणार नाही. लवकर शाळा सुरू करून पालकांकडून भरमसाठ फी वसुलीचा तगादा लावायचा हाच कार्यक्रम या इंग्रजी शाळांना राबवायचा आहे. त्यासाठी शाळा लवकर सुरू करून विद्यार्थ्यांना मरणाच्या दारात ढकलायचे आहे का? असा प्रश्‍न निर्माण होतो आहे. कोणीही आर्थिक राजकारण करू नये व विद्यार्थ्यांच्या जीवांशी खेळू नये. शासनाने विद्यार्थीहीत लक्षात घेऊन करोनाची परिस्थिती आटोक्‍यात आल्यानंतरच शाळा सुरू करण्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा.
– संभाजी शिरसाट, अध्यक्ष, शिक्षक क्रांती संघटना

Leave A Reply

Your email address will not be published.