नवी दिल्ली – शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जमसंडेकर यांच्या हत्या प्रकरणात सन 2008 साली जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कुख्यात गॅंगस्टर अरूण गवळी याने आपल्या शिक्षेला आव्हान देणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे, त्या प्रकरणात कोर्टाने महाराष्ट्र सरकारचे मत मागवले आहे.
अरूण गवळी याला झालेली जन्मठेपेची शिक्षा मागच्याच महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवली आहे. त्या निर्णयाला गवळीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ती याचिका आज न्या. आर. भानुमती आणि न्या. ए. एस बोपण्णा यांच्या खंडपीठापुढे सुनावणीसाठी आली आहे. ही याचिका सुनावणीसाठी घेण्याचे कोर्टाने मान्य केले आहे. त्यावरून राज्य सरकारला त्यांचे म्हणणे सादर करण्याची नोटीस जारी करण्यात आली आहे.
गवळीला मोक्का अंतर्गत अटक करण्यात आली असून जमसंडेकर हत्या प्रकरणात ट्रायल कोर्टाने त्याला जन्मठेपेची जी शिक्षा सुनावली होती ती शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने 9 डिसेंबर 2019 रोजी वैध ठरवली आहे. या प्रकरणात 21 मे 2008 पासून गवळी कारागृहात आहे.