Agriculture Policy : महाराष्ट्रात सुरू झालेले गटशेतीची मोठी चळवळ पाहता गटशेतीचे एक नवीन धोरण राज्यात आणू, गटशेती करणाऱ्यांना कशा प्रकारे मदत, योगदान देता येईल आणि गटशेतीला लोकचळवळीचे स्वरूप कसे देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पाणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘सत्यमेव जयते’ फार्मर चषक २०२४ च्या वितरण समारंभात ते बोलत होते.
यावेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, पाणी फाऊंडेशनचे आमिर खान, किरण राव, सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा, पद्मश्री पोपटराव पवार, डॉ. सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, दिवसेंदिवस शेतीचा आकार लहान होत असल्याने ७५ टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. अशा वेळी गट शेतीचा स्वीकार केला तर यांत्रिक पद्धतीने शेती करणे शक्य होईल. गटशेतीतून गावांमधील भांडण तंटेही कमी होतील, या गोष्टीचा विचार करून लवकरच राज्यात गटशेतीसाठी नवीन धोरण आणू. गटशेती करणाऱ्या सर्व गटांना कृषी विभागामार्फत मोफत ड्रोन दिले जातील. मात्र रासायनिक शेती न करण्याची अट राहील, असे कृषिमंत्री कोकाटे यांनी स्पष्ट केले.
शेती शाश्वत करायची असेल तर आपली गावे जलसमृद्ध, जलपरिपूर्ण होणे आवश्यक आहे. ५२ टक्के महाराष्ट्र अवर्षण प्रवण आहे, त्यामुळे जलसंधारणातूनच परिवर्तन करू शकतो. गावे पाण्याचे अंकेक्षण करणार नाहीत, त्यातील शास्त्र शिकणार नाहीत त्यात लोकसहभाग वाढणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र दुष्काळीच राहील हे लक्षात घेऊन राज्य शासनाने २०१५ साठी जलयुक्त शिवार योजना सुरू करून एक लोकचळवळ सुरू केली. त्यावेळी पाणी फाउंडेशनने लोकांमध्ये जलसंधारणाच्या कामांची चुरस निर्माण केली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक आवश्यक
आपल्या शेतीमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक असून शेती मदत आणि पुनर्वसनाच्या पलिकडे गेली पाहिजे. शेतीमध्ये दरवर्षी विविध प्रकारचे नुकसान झाल्यामुळे मदतीच्या स्वरुपात १० ते १५ हजार कोटी रुपये दिले जातात. परंतु, त्यातून शेतीत गुंतवणूक होत नाहीत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी, स्मार्ट योजना या गुंतवणुकीच्या योजना असून शेतीतील भांडवली गुंतवणूक वाढली तर शेतकरी अधिक सक्षम होऊ शकेल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
गटशेतीचा विचार वेगाने पसरावा
शेती लहान होत गेल्यामुळे शेती परवडेनाशी झाली आहे. ७५ टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्याला यांत्रिकी शेती परवडणार नाही. त्यामुळे गटशेती केल्यास ही गुंतवणूक करण्याची क्षमता वाढते. गटशेती केल्यामुळे लागणारा खर्च कमी होतो आणि उत्पादकता वाढते. त्यामुळे गटशेतीच्या माध्यमातूनच शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन करू शकतो. शासनाच्या अनेक योजना असून त्या योजनांचे एकत्रिकरण करुन लाभ देणे हे शेतकऱ्यांनी गटशेतीकडे वळाल्यास शक्य होईल. त्यामुळे हा गट शेतीचा विचार वेगाने पसरला पाहिजे, असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.