- पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून होणार विकास
पिंपरी – मोशी परिसरात सफारी पार्क आणि मनोरंजन केंद्राच्या कामाला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून या प्रकल्पाचा विकास होणार आहे. मोशी येथे डीअर सफारी पार्क आणि मनोरंजन केंद्र उभारण्यात येणार असल्याने शहरातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
तत्कालीन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासोबत 2019 मध्ये बैठक घेण्यात आली होती. मात्र, त्यानंतर निवडणूक आचारसंहिता सुरू झाली. निवडणुकीनंतर महाविकास आघाडीने सरकार स्थापन झाले. त्यानंतर कोविड-19 ची परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, हा प्रकल्प रखडणार, अशी चिन्हे निर्माण झाली होती.
मात्र, आमदार महेश लांडगे यांनी हाती घेतलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला महाविकास आघाडी सरकारने सकारात्मक दृष्टीकोनातून गती देण्याची भूमिका घेतली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील विकास आराखड्यातील मोशीतील सफारी पार्क व मनोरंजन केंद्र या आरक्षणाचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून विकास करण्याचे राज्य सरकारचे नियोजन आहे.
त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (मंगळवारी) मुंबईत बैठक घेवून कामाचा आढावा घेतला. यामुळे सफारी पार्क, मनोरंजन केंद्राच्या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीला पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायर, महाव्यवस्थापक आशुतोष सलील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.