संघटनेची माहिती : विविध मागण्यांचा पाठपुरावा सुरूच
पुणे – जुनी पेन्शन योजना लागू करावी, खासगीकरण आणि कंत्राटीकरण रद्द करावे आदी मागण्यांसाठी दि. 8 जानेवारी रोजी कर्मचारी संप पुकारणार आहेत, अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यावेळी संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख सुरेंद्र सरतापे, मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष जगदीश कांदे आदी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजनेऐवजी जुन्या पेन्शन आराखड्यानुसार पेन्शन सुरू करावी. यासह शासकीय कार्यालयांतील खासगीकरण आणि कंत्राटीकरण रद्द करावे. कंत्राटीकरणामुळे अनेक शासकीय कार्यालयांतील पदे रिक्त आहेत. यामुळे रिक्त पदांच्या वाढत्या संख्येसह कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. पर्यायाने कर्मचाऱ्यांना शासकीय लाभांपासून वंचित राहावे लागत आहे.
त्यामुळे कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर कायमस्वरूपी करावे, अशी प्रमुख मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे. येत्या 8 जानेवारी देशव्यापी संप पुकारण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 17 लाख सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत. सुमारे 72 संघटना या संपाशी संलग्न असल्याची माहिती सरतापे यांनी दिली.