मुंबई – अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने जो गुन्हा नोंदवला आहे त्या अनुषंगाने सीबीआयने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांना चौकशीसाठी समन्स जारी केले आहेत.
तथापि सीबीआयच्या या समन्सला राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. येत्या 20 ऑक्टोबरला याची सुनावणी होणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला सीबीआयने कुंटे व पांडे यांच्यावर समन्स जारी करून त्यांना आठवड्याच्या आत सीबीआयपुढे चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना केली होती.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीरसिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना शंभर कोटी रूपयांच्या वसुलीची मागणी केली होती असा आरोप केला होता. त्या प्रकरणात मुंबई हायकोर्टानेच सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचा आदेश दिला होता. त्या प्रक्रियेत सीबीआयने राज्याच्या पोलिस महासंचालकांना आणि मुख्य सचिवांनाच समन्स जारी केल्याने राज्य सरकारनेही आता आक्रमक भूमिका घेतली आहे.