मुंबई : जगाला जवळपास एक वर्षापासून कोरोनाने जेरीस आणले आहे. त्यापार्श्वभूमीवर 2020 या वर्षातील सर्वच सण अगदी साधेपणाने साजरा करण्यात आले. दरम्यान, आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ख्रिसमस या सणासाठी राज्य शासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, सर्व ख्रिस्त धर्मीयांना यंदाचा ख्रिसमस सण हा अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या नव्या प्रकाराची माहिती मिळताच महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये आतापासूनच सावधगिरीची पावले उचलली जात आहेत.
त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. 5 जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू, संचारबंदीचे हे नियम लागू असतील. शिवाय ख्रिसमस सण साजरा करण्यासाठीही ठराविक नियमांचे सर्वांना पालन करावे लागणार आहे. ख्रिसमस सणासाठी आखून दिलेल्या या नियमावलींचे पालन करत नागरिकांनी प्रशासनाला मदत करत कोरोना नियंत्रणात ठेवण्याच्या या युद्धात हातभार लावावा असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे.
ख्रिसमससाठीचे नियम खालीलप्रमाणे…
* स्थानिक चर्चमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या मासमध्ये 50हून जास्त जणांचा समावेश नसावा.
* कोणत्याही वेळेत चर्चमध्ये गर्दी होणार नाही याची संबंधितांनी काळजी घ्यावी.
* सुरक्षित शारीरिक अंतर अर्थात फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासोबतच चर्च परिसराचं नियमितपणे निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करणं अनिवार्य.
* चर्चमध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी मास्कचा वापर बंधनकारक.
* चर्चमध्ये प्रभू येशुचं स्तुतीगीत गाण्यासाठी 10हून जास्त व्यक्तींचा सहभाग नसावा.
* स्तुतीगीत गातेवेळी वापरण्यात येणारे माइक स्वच्छ असण्याबाबत काळजी घ्यावी.
* 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 10 वर्षांखाली लहान मुलांनी चर्चमध्ये आणि घराबाहेर जाणं टाळावं. याऐवजी यंदा त्यांनी घरातच हा सण साजरा करावा.
* कोणत्याही प्रकारे गर्दीला आकर्षित करणारे देखावे, आतिषबाजीचं आयोजन करु नये.
* 31 डिसेंबरला आभारप्रदर्शनासाठीचे मास आयोजित करतेवेळी वेळेचे निर्बंध पाळत मध्यरात्रीऐवजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास याचं आयोजन करावं.