मुंबई: राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस झपाट्याने वाढतच चालला आहे. त्यात सर्वसामान्यांपासून ते राजकारणी लोकांनाही याचा विळखा बसताना दिसत आहे. दरम्यान, राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याविषयी वर्षा गायकवाड़ यांनीच ट्विट करून माहिती दिली.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. “आज माझ्या तपासणी दरम्यान मला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यामुळे मी बरी आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे करोना चाचणी करुन घ्यावी. सुरक्षित राहा आणि काळजी घ्या” असं ट्विट त्यांनी केलं आहे.
नमस्कार, आज माझ्या तपासणीदरम्यान
मला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यांमुळे मी बरी आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे करोना चाचणी करून घ्यावी. सुरक्षित राहा. काळजी घ्या.— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) September 22, 2020
धारावीतील करोना बाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी वर्षा गायकवाड यांनी अविरत प्रयत्न केले. करोनाच्या काळात शिक्षण विभाग हाताळण्याचे कौशल्यही त्यांनी दाखवून दिले. वर्षा गायकवाड लवकर बऱ्या होतील आणि पुन्हा जनेसेवचे काम करतील अशी खात्री मला असल्याचे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
दरम्यान मागील पाच दिवसात महाविकास आघाडीच्या चार मंत्र्यांना करोनाची बाधा झाली आहे. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या दोन्ही मंत्र्यांचा करोना चाचणी अहवाल एकाच दिवशी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर जलसंपदा राज्य मंत्री बच्चू कडू यांनाही करोनाची बाधा झाली. या तिन्ही मंत्र्यांवर उपचार सुरु आहेत. अशात राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनाही करोनाची बाधा झाली आहे. वर्षा गायकवाड यांची प्रकृती चांगली आहे याबाबत त्यांनीच ट्विट करुन माहिती दिली आहे.