मार्गदर्शक सूचनांच्या कठोर अंमलबजावणीची राज्यांना सूचना

नवी दिल्ली : देशात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व मंत्रालये, विभाग, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी एकत्रित सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या एकत्रित सुधारित मार्गदर्शक सूचना 3 मे पर्यंत लागू राहणार आहेत.

कार्यालये, कामाच्या जागा, कारखाने आणि आस्थापनांमध्ये सामाजिक अंतर राखण्यासाठीची प्रमाणित प्रक्रिया आणि लॉकडाऊन काळात निर्देशांचे उल्लंघन करण्याच्या गुन्ह्याबद्दल आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये दंडाची तरतूद करण्यात आल्या आहेत.

लोकांची गैरसोय कमी करण्याच्या दृष्टीने निवडक अतिरिक्त बाबींना परवानगी देण्यात येणार असून त्या 20 एप्रिल पासून लागू राहतील. मात्र लॉकडाऊनच्या काळात पालन करायच्या मार्गदर्शक सूचनांना अनुसरून राज्ये, केंद्रशासित प्रदेश, जिल्हा प्रशासनातर्फे या अतिरिक्त बाबींना परवानगी दिली जाईल. या सवलती देताना कार्यालये, कामाच्या जागा, कारखाने आणि संस्थांमध्ये सामाजिक अंतर राखण्यासाठी तसेच संबंधित क्षेत्रात आवश्‍यक अशा बाबींची खबरदारी घेतली जाईल, याची खातरजमा राज्ये, केंद्रशासित प्रदेश, जिल्हा प्रशासनाने केली पाहिजे.

राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश, जिल्हा प्रशासनाने कंटेनमेंट झोन ठरवलेल्या क्षेत्राला या एकत्रित सुधारित मार्गदर्शक सूचना लागू राहणार नाहीत. कंटेनमेंट झोनमध्ये एखादे नवे क्षेत्र समाविष्ट झाल्यास, ते क्षेत्र कंटेनमेंट झोनमध्ये समाविष्ट होण्यापूर्वी त्या क्षेत्राला परवानगी असणाऱ्या बाबी रद्द होतील, मात्र आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार परवानगी असलेल्या बाबी लागू राहणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.