माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याची मला माहिती नाही-पवार
मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांवर ईडीने गुन्हा दाखल केला, त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हे गुन्हे दाखल करण्यात आल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का आहे. नियमबाह्यरित्या कर्ज वाटप केल्याचा आरोप या नेत्यांवर ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी हे आरोप फेटाळून लावले असून, मी कधीच कुठल्या बँकेचा संचालक नव्हतो, ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केल्याची मला माहिती नाही. गुन्हा दाखल करण्यात आला असेल तर मी त्याचे स्वागत करतो. माझ्या दौऱ्यांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळेच ही कारवाई करण्याची वेळ आली असावी, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विट करत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “परवा फडणवीस म्हणतात पवारांना संपवणार आणि आज ईडी पवारांवर केस दाखल करते!! याचा अर्थ कळतो काय तुला महाराष्ट्रा?, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
परवा फडणवीस म्हणतात पवारांना संपवणार आणि आज ईडी पवारांवर केस दाखल करते!!
याचा अर्थ कळतो काय तुला महाराष्ट्रा?
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 24, 2019