राज्य मंडळाची वेबसाइट सुरळीत

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्व्हरची संख्या वाढवण्याबरोबरच तांत्रिक अडचण दूर केल्यामुळे इयत्ता दहावीचा निकाल विनाअडथळा पाहता येत आहे.

इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या दोन्ही वेबसाइटवर लोड आल्याने शुक्रवारी सर्व्हर डाऊन झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहता येत नव्हता. विद्यार्थी, पालक मोबाइल दिवसभर हातात घेऊनच बसले होते. काहींनी सायबर कॅफेतही तळ ठोकला होता.

वेबसाइट का ओपन होत नाही याची विचारणा करण्यासाठी राज्य मंडळ, विभागीय मंडळातील फोन सतत खणखणत होते. तक्रारींची दखल घेऊन तत्काळ वेबसाइट पूर्वपदावर आणण्यासाठी धावाधाव सुरू झाली होती. दरम्यान, सर्व्हरमधील तांत्रिक बिघाड दूर करण्यात सायंकाळी यश आले.

त्याबरोबर निकाल पाहण्यासाठी एकूण तीन लिंक उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे शनिवारी निकाल पाहण्यात कोणाला फारशा अडचणी आल्या नाहीत. दरम्यान, काही विद्यार्थ्यांना लिंक ओपन होत असली तरी निकाल डाऊनलोड करण्यात अडचणी येत होत्या. अखेर त्यांनी निकालाचे स्क्रिनशॉट काढण्याचाच मार्ग अवलंबला आहे.

दहावीचा निकाल पाहण्यातील अडचण दूर करण्यात आली आहे. तांत्रिक घटकांमध्ये दुरुस्ती करण्यात आली असून उपलब्ध असलेल्या सर्व्हरच्या संख्येत वाढ केली आहे. त्यामुळे तक्रारींचे प्रकार थांबले आहे. आतापर्यंत 14 लाख जणांनी निकाल पाहून ते डाऊनलोड केले आहेत.
– दिनकर पाटील, अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.