पुणे – केंद्र शासनाने सीबीएसईच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा होणारच आहेत. याबाबत राज्य शासनाकडून परीक्षा घेण्यावर ठाम असल्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे तर बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. राज्यातील करोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला होता.
आता बारावीच्या परीक्षा मे अखेरीस तर दहावीच्या परीक्षा जूनमध्ये घेण्यात येणार आहे, त्याबाबतची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. केंद्र शासनाने सीबीएसईची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द होणार नाहीत. या परीक्षा कोणत्याही परिस्थितीत होणारच आहेत, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख तर बारावीच्या परीक्षेसाठी 14 लाख याप्रमाणे एकूण 30 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
प्रत्येक बोर्ड ह स्वायत्त असल्याने निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबतच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन विद्यार्थीहितासाठी परीक्षा घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याच्या दृष्टीनेच तयारी सुरू असल्याचे दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
अकरावीच्या प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण होणार
सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा मात्र होणार आहेत. यामुळे पुढे इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी गोंधळ उडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आवडीच्या शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अडथळे निर्माण होण्याची व अधिक स्पर्धा करावी लागण्याची शक्यता वाटते आहे. याबाबत विद्यार्थी, पालकांनाही बरेच प्रश्न पडू लागले आहेत.