मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने विकास दराला चालना देण्यासाठी व्याजदरात वाढ टाळली असली तरी वाढत्या महागाईमुळे नजीकच्या भविष्यात व्याजदर वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे. भारतातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने शुक्रवारी आपल्या बेस रेटमध्ये 0.1 टक्क्यांची वाढ केली. लवकरच इतर बॅंका स्टेट बॅंकेच्या पावलावर पाऊल ठेवून व्याजदरात वाढ जाहीर करणे अपेक्षित आहे.
स्टेट बॅंकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आता स्टेट बॅंकेचा वाढलेला बेस रेट 7.55 टक्के असेल. या निर्णयाची अंमलबजावणी 15 डिसेंबरपासून होणार आहे. जानेवारी 2019 आगोदर ज्या खातेदारांनी कर्ज घेतले आहे त्यांच्या कर्जावरील हप्त्यावर याचा परिणाम होणार आहे.
स्टेट बॅंकेने बेंचमार्क प्राइम लॅंडिंग रेट म्हणजे बीपीएलआरमध्ये वाढ करून 12.3 टक्के केला आहे. हा दर अगोदर 12.2 टक्के होता. स्टेट बॅंकेने म्हटले आहे की दोन कोटी किंवा त्यापेक्षा अधिक ठेवीच्या रकमेवर आता 0.1 टक्के अधिक व्याज मिळणार आहे.
रिझर्व्ह बॅंकेने गेल्या पंधरवड्यात आपले पतधोरण जाहीर केले आहे. यामध्ये रिझर्व्ह बॅंकेने आपल्या मुख्य रेपो या व्याजदरात बदल न करता तो चार टक्के कायम ठेवला आहे. गेल्या नऊ पतधोरणामध्ये हा व्याजदर चार टक्के या पातळीवर कायम ठेवण्यात आला आहे. मात्र पतधोरण जाहीर करताना रिझर्व्ह बॅंकेने महागाई वाढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी पतधोरणात व्याजदरात वाढ होण्याची शक्यता गृहीत धरण्यात येत आहे. असे असतानाच स्टेट बॅंकेने व्याजदर वाढविण्यसाठी पुढाकार घेतला आहे.