पुणे – नाशिकच्या श्रावणी वालेकरने तेरा वर्षाखालील गटाच्या राज्य निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेत दोन गटांमध्ये अजिंक्यद मिळवित तिहेरी कामगिरी केली. ही स्पर्धा मॉडर्न क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली होती. वालेकरने एकेरीतील उपांत्य सामन्यातच अग्रमानांकित कंदास्वामीचा पराभव करीत सनसनाटी कामगिरी केली.
चुरशीने झालेला हा सामना तिने 21-16, 8-21, 21-11 असा जिंकला. तिने स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा बहारदार खेळ केला. तसेच तिने सर्व्हिसवरही योग्य नियंत्रण ठेवले होते. पाठोपाठ अंतिम लढतीत तिने बी.नैशाकुमारीवर 21-14, 21-13 असा सरळ दोन गेम्समध्ये विजय मिळविला. तिने ड्रॉपशॉट्सचा कल्पकतेने उपयोग केला. दुहेरीत तिने मुंबई शहर संघाच्या तारिणी सुरीच्या साथीत विजेतेपद पटकाविले. या जोडीने क्रिशा सोनी (नागपूर) व कुंजल मंडीक (अमरावती) यांना 21-15, 21-16 असे पराभूत केले.
मुलींच्या 10 वर्षाखालील गटात अमरावतीची निमिशा कोटेचा विजेती ठरली. तिने अंतिम सामन्यात अग्रमानांकित दर्शिता राजगुरू या नाशिकच्या खेळाडूला 21-14, 21-15 असे हरविले. तिने कॉर्नरजवळ प्लेसिंगचा कल्पकतेने उपयोग केला. दर्शिताने केलेल्या चुकांचाही तिला फायदा झाला.
मुलांच्या 13 वर्षाखालील गटात सर्वेश यादवला अजिंक्यपद मिळाले. ठाण्याच्या या खेळाडूने अंतिम सामन्यात पुण्याच्या आदित्य त्रिपाठीचे आव्हान 22-20, 21-17 असे परतविले. दोन्ही खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. मात्र निर्णायक क्षणी यादवला आदित्यच्या अक्षम्य चुकांचा फायदा झाला. दुहेरीत मात्र यादवला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अर्जुन भगत व यशराज कदम या स्थानिक जोडीने यादव व त्याचा सातारा येथील सहकारी ऋषिकेश देवकर यांचा 21-16, 21-14 असा पराभव केला.
मुलांच्या 10 वर्षाखालील गटात ठाण्याचा यश सिन्हाने विजेतेपदावर आपले नाव कोरले. त्याने अग्रमानांकन सार्थ ठरविताना सचित त्रिपाठीवर 21-15, 21-13 अशी मात केली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बॅडमिंटन संघटक रणजित नातू यांच्या हस्ते झाला.