देशात सर्वाधिक 3 हजार 661 स्टार्टअप महाराष्ट्रात

राज्यात 68 स्टार्टअपमध्ये 440 कोटी 38 लाखांची वैकल्पिक गुंतवणूक

नवी दिल्ली – “स्टार्टअप इंडिया’ योजनेंतर्गत चार वर्षात देशभरात 19 हजार 351 स्टार्टअप उद्योगांची नोंदणी झाली. यात सर्वाधिक 3 हजार 661 स्टार्टअप उद्योगांची नोंदणी एकट्या महाराष्ट्रात झाली आहे.

या योजनेंतर्गत देशातील राज्यांमध्ये स्टार्टअप उद्योगात झालेल्या वैकल्पिक गुंतवणुकीतही महाराष्ट्राने आघाडी घेत देशात दुसरा क्रमांक मिळवला आहे. राज्यात एकूण 68 स्टार्टअपमध्ये 440 कोटी 38 लाखांची वैकल्पिक गुंतवणूक झाली आहे. ही माहिती केंद्रीय उद्योग व वाणीज्य मंत्री  यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लिखीत उत्तरात दिली आहे.

केंद्रीय उद्योग व वाणीज्य मंत्रालयाच्या वतीने 16 जानेवारी 2016पासून देशभरात “स्टार्टअप इंडिया’ योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. एकूण 19 कृती आराखड्यानुसार सुरु असलेल्या या कार्यक्रमावर देखरेख ठेवणाऱ्या केंद्रीय उद्योग व वाणीज्य मंत्रालयाच्या उद्योग व देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीपीआयआयटी) 24 जून 2019 रोजी राज्यनिहाय स्टार्टअप उद्योगांची यादी जाहीर केली आहे. या यादीत देशातील 29 राज्य आणि 7 केंद्र शासीत प्रदेशांची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून 3 हजार 661 स्टार्टअप उद्योगांसह महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे.

या यादीत महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक (2, 847), दिल्ली (2,552), उत्तरप्रदेश (1,566) तर 1 हजार 80 स्टार्टअपसह तेलंगणा पाचव्या स्थानावर आहे.

वैकल्पिक गुंतवणूकीत महाराष्ट्र दुसरा

लघु उद्योग विकास बॅंकेने (सीडबी) भांडवली बाजारावर देखरेख ठेवणाऱ्या “सेबी’ संस्थेकडे नोंदणीकृत संस्थांच्या माध्यमातून स्टार्टअप उद्योगांसाठी वैकल्पिक गुंतवणूक निधी उभारला आहे. या निधीच्या माध्यमातून देशभरात 13 राज्य आणि दिल्ली या केंद्र शासीत प्रदेशात 247 स्टार्टअप उद्योगांत 1 हजार 625 कोटी 73 लाखांची वैकल्पिक गुंतवणूक केली आहे. या यादीत महाराष्ट्र 68 स्टार्टअपमधील 440 कोटी 38 लाखांच्या वैकल्पिक गुंतवणुकीस दुसऱ्या स्थानावर आहे. तर 75 स्टार्टअपमधील 499 कोटी 85 लाखांच्या वैकल्पिक गुंतवणुकीस कर्नाटक पहिल्या स्थानावर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.