पुणे मेट्रोच्या भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात

गिरीश बापट यांच्या हस्ते भूमिपूजन

पुणे – नियोजित पुणे मेट्रोच्या पाच कि.मी.चा मार्ग भुयारी असून, त्याची सुरुवात कृषी महाविद्यालयातून होणार आहे. येथे पहिल्या शाफ्टचे काम सुरू होणार असून, त्याच्या रॅम्पचे भूमिपूजन पालकमंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते गुरुवारी करण्यात आले.

यावेळी स्थानिक आमदार विजय काळे, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक आदित्य माळवे, सोनाली लांडगे, राजश्री काळे, महेश लडकत, अजय खेडेकर उपस्थित होते. कृषी महाविद्यालयाचे डॉ. प्रमोद रसाळ आणि डॉ. सुनील म्हसाळकर, महामेट्रोतर्फे रामनाथ सुब्रह्मण्यम आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

कृषी विद्यापीठ ते स्वारगेटपर्यंतच्या भुयारी मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे. या मार्गात शिवाजीनगर बसस्थानक, सिव्हिल कोर्ट, फडके हौद, मंडई आणि स्वारगेट अशी भुयारी स्थानके आहेत. भुयारी मार्गाच्या कार्यादेश टाटा गुल्लेरमार्क या अग्रगण्य कंपनीला देण्यात आला आहे.

पीसीएमसीपासून सुरू होणारा उन्नत मेट्रोमार्ग कृषी महाविद्यालयापासून पुढे भुयारी केला जाणार आहे.या भुयारीमार्गाचे काम जलदगतीने होण्यासाठी मेट्रोने पहिलेच शाफ्टचे काम सुरू केले असून, सध्या शाफ्टलगत रॅम्प बनवण्यात येत आहे. उन्नत 18 ते 20 मीटर उंचीवरून भुयारी 18 ते 20 मीटर जमिनीखाली जाण्यासाठी 600 ते 800 मीटर रॅम्प बनवण्याची गरज पडते. कृषी महाविद्यालयाच्या ठिकाणी अशा प्रकारच्या रॅम्पसाठी जागा उपलब्ध आहे.

भुयारी मार्गाच्या कामासाठी दोन निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यापैकी पहिल्या निवेदेच्या कामाची सुरुवात गुरुवारी झाली असून या भुयारी मार्गाची लांबी 3.74 कि.मी. आहे. एकूण दोन टनेल बनविण्यात येणार असून, त्यांची एकत्रित लांबी 7.48 कि.मी. असणार आहे. या कामासाठी 1,123 कोटी रुपये खर्च येणार असून, त्यात शिवाजीनगर आणि जिल्हा न्यायालय येथे दोन भूमिगत स्थानके उभारण्यात येणार आहे. पुणे महापालिका तसेच कृषी महाविद्यालय यांचे देखील मेट्रो कामासाठी महत्त्वाचे योगदान दिल्याबद्दल पालकमंत्र्यांनी या कार्यक्रमात आभार मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here