स्मार्ट कार्डद्वारे करा एसटीचा प्रवास

तिकीट आता कालबाह्य होणार : स्मार्ट कार्डच्या नोंदणीला सुरुवात

पुणे – सर्वसामान्य प्रवाशांची “लाईफ लाइन’ अशी ओळख असलेल्या एसटी बसच्या तिकिटाची देखील वेगळीच ओळख आहे. आकड्यांपासून ते डिजिटलपर्यंत प्रवास करणारे एसटीचे तिकीट आता कालबाह्य होणार आहे; कारण “स्मार्ट कार्ड’द्वारे आता प्रवाशांना एसटीतून प्रवास करता येणार आहे. एक जूनपासून या स्मार्ट कार्डच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या आठ दिवसांच्या कालावधीत महामंडळाच्या सर्व विभागांमध्ये या नोंदणीला अपेक्षेपेक्षाही अधिक प्रतिसाद मिळत आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून प्रवाशांच्या सेवेसाठी धावणाऱ्या “लालपरी’ ने नुकतीच 71 वर्षे पूर्ण केली आहेत. एसटी महामंडळाने देखील काळानुरुप आपल्या सुविधा आणि सेवांमध्ये बदल करून प्रवाशांना अधिक सुखकर आणि आरामदायी सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. आता एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी “स्मार्ट कार्ड’ आणले आहे. विविध प्रकारच्या प्रवासी सवलत घेणाऱ्या प्रवाशांबरोबरच सर्वसामान्य प्रवाशांनादेखील “स्मार्ट कार्ड’ घेता येणार आहे. त्यासाठी प्रवाशांना मोबाइल प्रमाणेच प्रवाशाला रिचार्ज करावा लागणार आहे. या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून तो कोणत्याही शहरातून आणि एसटी महामंडळाच्या कोणत्याही बसमधून प्रवास करू शकणार आहे. स्मार्ट कार्डमुळे सुट्ट्या पैशांचा निर्माण होणारा वाद टळणार आहेच. त्याशिवाय पैसे खिशात नसतील, तरीही रिचार्ज केलेल्या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवाशाला प्रवास करणे सुलभ होणार आहे. या “स्मार्ट कार्ड’ योजनेतील मोठे लाभार्थी हे विद्यार्थी आहेत.

त्यामुळे पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या स्मार्ट कार्डचे रजिस्ट्रेशन केले जाणार आहे. या योजनेत सर्व आगारांतील मुख्य बसस्थानकावर विद्यार्थ्यांसाठी “स्मार्ट कार्ड’ प्रणालीची नोंदणी केली जाणार आहे. ही नोंदणी झाल्यानंतर “स्मार्ट कार्ड’ 10 ते 15 दिवसांत उपलब्ध होणार आहे. नोंदणीकरण केलेल्या विद्यार्थ्यांनी पासची मागणी केल्यास त्या विद्यार्थ्याला तात्पुरत्या स्वरूपाचा एक महिना मुदतीचा कागदी पास देण्यात येणार आहे.

स्मार्ट कार्ड योजना ही योजना प्रवाशांसाठी निश्‍चितपणे फलदायी ठरणार आहे. त्यामुळेच स्मार्ट कार्डच्या नोंदणीला अपेक्षापेक्षा प्रतिसाद मिळत आहे. तसेच एसटी महामंडळाची डिजिटलकडे वाटचाल सुरू आहे.
– यामिनी जोशी पुणे विभागाच्या विभागीय नियत्रंक

लवकरच प्री-पेड सेवाही
एसटी महामंडळाने सुरू केलेल्या “स्मार्ट कार्ड’ योजनेचा पुढचा टप्पा हा प्रिपेड कार्ड असणार आहे. यामध्ये प्रवाशाचे कार्ड हे त्याच्या बॅंक खात्याशी संलग्न केले जाणार आहे. यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. संबंधित प्रवासी हे “स्मार्ट कार्ड’ कोणत्याही मार्गावर वापरू शकतो. वाहकाने स्मार्ट कार्ड स्कॅन केल्यानंतर प्रवासी भाड्याची रक्‍कम संबंधित प्रवाशाच्या खात्यातून एसटी महामंडळाच्या खात्यात वर्ग होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.