आरंभ विश्वचषकाचा!

30 मे म्हणजेच उद्यापासून इंग्लंडमध्ये आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप सुरु होतोय. या वेळीचा वर्ल्डकप हा सर्वाधिक आव्हानात्मक वर्ल्डकप ठरणार असून याच कारण असं की जगातील सर्वोत्तम दहा संघ या वर्ल्डकपमध्ये एकमेकांशी रॉबिन राउंड पद्धतीने भीडणार आहेत. याचा अर्थ असा की प्रत्येक संघाला साखळी सामन्यांमध्ये 9 संघांशी लढत द्यायची आहे. यातील सर्वोत्तम चार संघ उपांत्य फेरीमध्ये लढणार असून प्रत्येक संघाला शेवटपर्यंत आपला फॉर्म टिकवून ठेवावा लागणार आहे. या वर्ल्डकप मधील पहिलाच सामना इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा रंगणार आहे. हे दोन्ही संघ यावेळी संभाव्य विजेते म्हणून गणले जात आहेत. यामुळेच या दोन्ही संघांपैकी एकातरी संघाची जगजेत्तेपदाची प्रतीक्षा यावेळी संपणार का? असा प्रश्‍न क्रिकेट रसिक विचारित आहेत. या दोन्ही संघांची वर्ल्डकपमधील आजवरची कामगिरी त्यांची बलस्थाने आणि कच्चेदुवे याविषयी आपण माहिती घेऊ…

इंग्लंड या वर्षीच्या विजेतेपदासाठी क्रिकेट रसिकांसह अनेक माजी खेळाडूंची पहिली पसंती इंग्लंडचा संघ आहे कारण 2015 सालच्या वर्ल्डकपमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर या संघाने फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे झेप घेतली आहे. गेली दोन वर्ष हा संघ आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत अग्रस्थानी आहे. इंग्लंड संघाने विश्‍वचषक स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत तीनदा अंतिम फेरीत धडक मारली असली तरी अद्याप अंतिम सामना त्यांना जिंकता आलेला नाहीये. 1979 साली वेस्ट इंडिजने, 1987 साली ऑस्ट्रेलियाने आणि 1992 साली पाकिस्तानने त्यांना अंतिम सामन्यात धूळ चारत विश्‍वचषकापासून दूर लोटलं आहे. विश्‍वचषकात इंग्लंडने आजवर 73 सामने खेळले असून 41 सामन्यात विजय तर 30 सामन्यांमध्ये पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. इंग्लंड संघाने विश्‍वचषकात खेळलेले 2 सामने अनिर्णित देखील राहिले आहेत. यावेळी वर्ल्ड कपचे यजमानपद भूषवत असलेल्या इंग्लंडला खेळपट्ट्यांची पूर्ण कल्पना असून स्पर्धा होमग्राउंडवर होत असल्याने चाहत्यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा लाभणार आहे. अशातच इंग्लंडचे जवळपास सर्वच खेळाडू तुफान फॉर्ममध्ये असून सर्व खेळाडूंची सांघिक कामगिरी जुळून आल्यास इंग्लंडला यावेळी वर्ल्डकप जिंकण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंड पहिल्यांदा वर्ल्ड कपला गवसणी घालणार का? याकडे तमाम क्रिकेट रसिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

दक्षिण आफ्रिका ज्या संघाने ऍलन डोनाल्ड, जॅक कॅलीस, जोंटी ऱ्होड्‌स, लान्स क्‍लुजनर, मखाया अँटिनी, हंसी क्रोनिये, शॉन पॉलोक, ग्रॅमी स्मिथ असे जागतिक दर्जाचे खेळाडू क्रिकेट जगताला दिले त्या दक्षिण आफ्रिकेला मात्र आजवर एकदाही वर्ल्ड कप जिंकता आला नाही त्यामुळे दडपणाच्या परिस्थितीत खेळ उंचावण्यात नेहमीच अपयशी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेला चोकर्स ( दडपणाखाली ढेपाळणारे ) म्हणून ओळखले जाते. 1992 साली पहिलाच वर्ल्ड कप खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीत नशिबाने दगा दिला साखळी सामने सहज जिंकत उपांत्य फेरीत धडक मारलेल्या दक्षिण आफ्रिकेला डकवर्थ लुईस नियमाचा फटका बसला जिंकण्यासाठी 13 चेंडूत22 धावा असे समीकरण असताना पाऊस सुरु झाला 10 मिनिटाने पुन्हा खेळ सुरु झाल्यावर दक्षिण आफ्रिकेसमोर अवघ्या एका चेंडूत 22 धावा असे अशक्‍यप्राय आव्हान ठेवण्यात आले हा सामना आजही क्रिकेट रसिकांच्या स्मरणात आहे 1996 साली उपांत्यपूर्व फेरीत वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने त्यांचे स्वप्न धुळीस मिळवले 1999 साली देखील दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरी गाठली येथेही त्यांना नशिबाने साथ दिली नाही तीन चेंडूत एक धाव हवी असताना ऍलन डोनाल्ड दुर्दैवी रित्या धावबाद झाला आणि अंतिम फेरीत प्रवेश करण्याचे दक्षिण आफ्रिकेचे स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळाले. 2003 साली पुन्हा एकदा डकवर्थ लुईस नियमाने दक्षिण आफ्रिकेचा घात केला 2007 साली तिसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत पोहचू दिले नाही 2011साली दक्षिण आफ्रिका उपांत्यपूर्व फेरी पर्यंत मजल मारू शकला 2015 साली पुन्हा उपांत्य फेरीत न्यूझीलंडने त्यांचा विजय रथ रोखला वर्ल्डकप मध्ये दक्षिण आफ्रिकेने आजवर 55 सामन्यात 35 विजय तर 18 पराभव पाहिले असून 2 सामने अनिर्णित राहिले आहेत

इंग्लंडच्या खेळपट्टीला साजेशे वेगवान गोलंदाज डेल स्टेन कगीसो रबाडा लुंगी ऐनगीडी हे जगातील सर्वोत्कृष्ट तेज गोलंदाजांचं त्रिकुट त्यांना इम्रान ताहीर या अनुभवी लेगस्पिनरची साथ मिळाल्यास जगातील कोणत्याही संघाला स्वस्तात गुंडाळण्याची ताकद या संघात आहे. फलंदाजीत कर्णधार फाफ डुप्लिसेस, क्विंटन डिकॉक, जे पी ड्युमिनी, हाशीम आमला, डेव्हिड मिलर अशी तगडी फलंदाजांची फळी असणाऱ्या या संघाला निर्णायकवेळी खचून न जाता चांगली कामगिरी करणे महत्वाचे आहे. यावेळी तरी नशीब दक्षिण आफ्रिकेला साथ देईल का हे पाहणे रंजक ठरेल.

– श्‍याम बसप्पा ठाणेदार

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)