कुडाळमार्गे पुणे एसटी बस तातडीने सुरू करा

सौरभ शिंदे : लांब पल्ल्याची एकही बससेवा नसल्याने प्रवाशांची गैरसोय
कुडाळ – जावळी तालुक्‍यातून पुणे, खंडाळा, शिरवळ इत्यादी ठिकाणी शासकीय, न्यायालयीन, तसेच नोकरी व्यवसायानिमित्ताने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. परंतु या विभागातून पुण्याकडे जाणारी एकही एसटी बस सेवा सुरू नाही. त्यामुळे नियमित प्रवाशांबरोबरच पुण्याकडे विविध कामानिमित्त जाणाऱ्या वृद्ध, अपंग, विकलांग, महिलांना पाचवड येथे महामार्गावर धोका पत्करून तसेच विविध अडचणींना सामोरे जावून थांबावे लागते.

याबाबत अनेक प्रवाशांनी आपणाकडे या मार्गावर बस सेवा सुरु करण्याची आग्रही मागणी केली आहे. तरी याबाबत विभाग नियंत्रक तसेच मेढा आगार प्रमुखांनी तातडीने दखल घेऊन मेढा-कुडाळ-पुणे अशी बस सेवा सुरू करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य सौरभ शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या आशयाचे निवेदन त्यांनी मेढा आगार प्रमुखांना नुकतेच दिले.

मेढा मार्गे विविध लांब पल्ल्याच्या एसटी बस आहेत. याशिवाय महाबळेश्‍वरहुन येणाऱ्याही अनेक लांब पल्ल्याच्या बसेस मेढा मार्गे आहेत. परंतु कुडाळ विभागातील सुमारे सत्तर गावातील हजारो प्रवाशांना पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, सांगली अशा विविध ठिकाणी प्रवास करायचा झाल्यास पाचवडला महामार्गावर ऊन, वारा, पावसात धोका पत्करून उभे रहावे लागते. लांब पल्ल्याच्या एसटी बस पाचवड बसस्थानकात येत नाहीत. महामार्गावरही एसटी महामंडळाने प्रवाशी थांब्याची कोणतीही व्यवस्था केलेली नाही.

अनेक प्रवाशांकडे प्रवाशी बॅग व साहित्य व लहान लहान मुले असतात. अशा परिस्थितीत धोका पत्करून महामार्गावर उभे रहावे लागते. त्यामुळे भविष्यात कोणती दुर्घटना घडल्यास त्याला एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक जबाबदार राहतील व त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा सौरभ शिंदे यांनी दिला आहे. मेढा आगाराने कुडाळ मार्गे पुणे, मुंबई तसेच सांगली, कोल्हापुरकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू कराव्यात. विविध ठिकाणाहून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या पाचवड बसस्थानकात आणण्यासाठी चालक वाहकांना सूचना करावी अशी मागणी सौरभ शिंदे यांनी प्रवाशांच्यावतीने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.