ड्रोनद्वारे गावठाण मोजणी मोहीम सुरू

हवेली तालुक्‍यातील न्हावी सांडस येथे पहिली मोजणी

पुणे – शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत भूमि अभिलेख विभाग, ग्राम विकास विभाग आणि सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या विद्यमाने ड्रोनद्वारे राज्यातील गावठाण मोजणी मोहिमेस प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. हवेली तालुक्‍यातील न्हावी सांडस या गावातील गावठाण मोजणी गुरुवारी करण्यात आली.

गावठाण मोजणीसाठी ड्रोनने उड्डाण केले. त्यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांचा कडकडाट केला. देशात पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्यात गावठाण मोजणीसाठी ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. यावेळी अपर जमाबंदी आयुक्त ओमप्रकाश देशमुख, भूमि अभिलेख विभागाचे उपसंचालक किशोर तवरेज, सर्व्हे ऑफ इंडियाचे अधिकारी यांच्यासह भूमि अभिलेख विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. मोजणी अधिकारी आणि ग्रामस्थांच्या सहभागाने गावातील सर्व जागांचे चुन्याच्या सहाय्याने सीमांकन करण्यात आले होते. ड्रोनवरील उच्च दर्जाच्या कॅमेऱ्याने गावाचे छायाचित्रण विविध कोनातून करण्यात आले. छायाचित्रणाद्वारे प्राप्त होणाऱ्या इमेजवरून सर्व्हे ऑफ इंडियाकडून डिजिटल नकाशा तयार करण्यात आला. त्यानुसार गावातील मिळकतींचे अभिलेख तयार करण्यात येणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे गावठाण सर्व्हे करण्यात येणार असल्याने गावकऱ्यांचा सहभाग दिसून आला.

या सर्व्हेबाबत उपसंचालक तवरेज यांनी माहिती दिली. तसेच ओमप्रकाश देशमुख यांनी “ड्रोनद्वारे सर्व्हे झाल्याने जनतेला उपयोगी असे मिळकतींचे नकाशे व प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. त्यामुळे शासनाच्या योजनांचा फायदा ग्रामस्थांना घेता येणार आहे,’ असे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.