बंद करण्यात आलेला वाघोली-लोहगाव रस्ता सुरु करा

व्यावसायिक व ग्रामस्थांची निवेदनाद्वारे वाहतूक शाखेकडे मागणी

वाघोली – कुठलीही पूर्व सूचना न देता पुणे शहर वाहतूक उप-आयुक्त कार्यालयाकडून गुरुवारी बंद करण्यात आलेला वाघोली-लोहगाव रस्ता तात्काळ खुला करावा अशी मागणी  व्यावसायिक व ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे वाहतूक शाखेचे उपआयुक्त राहुल श्रीरामे यांचेकडे करण्यात आली आहे. त्वरित रस्ता खुला करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्थानिक रहिवाशांसह व्यावसायिकांनी दिला आहे.

लोहगाव-राहू हा राज्य मार्ग असून हा वाघोली गावठाणातून केसनंद, थेऊर मार्गे सोलापूर महामार्गाला जोडणारा आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक छोटेमोठे व्यावसायिक अनेक वर्षांपासून व्यवसाय करतात.

तसेच या रस्त्यालगत रहिवाशांची संख्या सुद्धा मोठ्याप्रमाणावर आहे. पुणे शहर वाहतूक शाखा उप-आयुक्त कार्यालयाकडून स्थानिक रहिवाशी व व्यावसायिकांना कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक आदेश काढून रस्ता पूर्णतः बंद करण्यात आला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे व्यवसायिकांची आधीच आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यातच वाहतूक विभाग उप-आयुक्त कार्यालयाकडून गुरुवार (दि. २१ ऑक्टोबर) रोजी आदेश काढून लोहगाव रस्ता बंद करण्यात आला. सदर आदेश हा स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांसाठी अन्यायकारक असून या स्त्यावर मोठ्याप्रमाणावर छोटेमोठे व्यावसायिक व्यवसाय करून आपली उपजीविका चालवतात.

दोन वर्षांपासून लॉकडाऊनमुळे नागरिकांसह व्यावसायिक आर्थिक संकटात असताना दिवाळी सणाच्या तोंडावर रस्ता बंद केल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. वाघोली-लोहगाव रस्त्यावरील वाहतुकीमुळे कोंडी होत असल्याचा निष्कर्ष अतिशय चुकीचा आहे. पुणे-नगर महामार्गावरील बेशिस्त पार्किंग, विरुद्ध दिशेने येणारी वाहने आदि अनेक कारणे कोंडीस कारणीभूत ठरत असताना फक्त लोहगाव रस्ता बंद करून वाहतूक कोंडी सोडवण्याचा दिखावा केला जात आहे.

योग्य नियोजनाचा अभाव व ठोस उपाययोजना करण्याऐवजी वाहतूक शाखेकडून अनावश्यक उपाययोजना करून कोंडी सोडवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वाहतूक कर्मचारी वाहतुकीचे नियमन करण्याऐवजी सावज हेरण्यात व मोबाईमध्ये मग्न असल्याने वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

वाघोली-लोहगाव रस्ता तात्काळ खुला करण्यात यावा अशी मागणी अष्टविनायक मित्र मंडळ, स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक यांनी वाहतूक शाखेचे उप-आयुक्त यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. वाघोली लोहगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तो  लवकरात लवकर तो खुला व्हावा ह्यासाठी वाघोलीचे पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे नेते संदीप थोरात,

वाघोली तंटामुक्ती  समिती अध्यक्ष सचिन काळे यांनी  वाघोली पोलिस चौकी चे पोलिस  सहायक पोलिस  निरीक्षक ( वाहतूक विभाग ) जयंत पाटील  यांना निवेदन देऊन लवकरात लवकर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा अन्यथा  दि. २७  रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.

प्रत्यक्षात लोहगाव रोड हा नगर रोडला पर्यायी मार्ग आहे. त्यामुळे हा पर्यायी मार्ग बंद करू नये. लोहगाव रस्ता बंद केल्यामुळे उलट दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. उलट दिशेने जाणाऱ्या वाहनांमुळे मोठी दुर्घटना होण्याचे शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यालगत असणारे जवळपास १०० ते १२० व्यावसायिक आर्थिक संकटात सापडणार आहेत.
स्थानिक रहिवाशी व व्यावसायिकांना पूर्वसूचना न देता बंद करण्यात आलेला रस्ता सुरु करण्यात यावा.
– चिराग सातव पाटील (युवा नेता, राष्ट्रवादी काँग्रेस )

वाघोली-लोहगाव रास्ता बंद करण्यात आला आहे. रस्ता बंद करण्याबाबत येथील रहिवाशांना संबधित विभागाकडून पूर्वसूचना देण्यात आली होती का? नागरिकांकडून सूचना घेतल्या असतील तर नेमक्या कोणत्या नागरिकांकडून सूचना घेतल्या याचा वाहतूक विभागाने खुलासा करावा.
– विक्रम वाघमारे

रस्ता बंद करणे हा आदेश  स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांसाठी अन्यायकारक असून या स्त्यावर मोठ्याप्रमाणावर छोटेमोठे व्यावसायिक व्यवसाय करून आपली उपजीविका चालवतात. दोन वर्षांपासून लॉकडाऊनमुळे नागरिकांसह व्यावसायिक आर्थिक संकटात असताना दिवाळी सणाच्या तोंडावर रस्ता बंद केल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. ग्रामस्थांसाठी हा रस्ता तातडीने खुला करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
– सचिन काळे (अध्यक्ष, तंटामुक्त समिती वाघोली)

नागरिकांच्या सूचना व हरकीतीचा विचार करून वाहतूक शाखेकडून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
– जयंत पाटील (सहा. पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, लोणीकंद)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.