सातारा, दि. 23 (प्रतिनिधी) -महावितरणच्या वेबपोर्टल व मोबाइल ऍपवर स्वतःहून मीटर रीडिंग पाठविणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या वीज वापरानुसार अचूक बिले देण्यात येत आहे. मे महिन्यात चालू रीडिंग पाठविणाऱ्या ग्राहकांना एप्रिल महिन्याच्या बिलातील सरासरी युनिट व रक्कम भरली असल्यास त्याचेही समायोजन करण्यात येत आहे. यासंबंधीची माहिती ग्राहकांसाठी वीज बिलांमध्ये नमूद करण्यात येत आहे.
महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर, सातारा जिल्ह्यांसह बारामती, इंदापूर, पुरंदर, भोर, शिरुर व दौंड (जि. पुणे) या तालुक्यांमधील 20 हजार 941 ग्राहकांनी एप्रिलमध्ये दिलेल्या मुदतीत स्वतःहून मीटर रीडिंग्ज पाठविली होते. त्यांना एप्रिल महिन्याच्या प्रत्यक्ष वीज वापरानुसार बिले देण्यात आली. ज्या ग्राहकांनी एप्रिलमध्ये रीडिंग्ज न पाठवता मे महिन्यात चालू मीटर रीडिंग्ज पाठविली, त्यांना एप्रिल व मे महिन्यात प्रत्यक्ष वीज वापरानुसार एकत्रित वीज बिले देण्यात येत आहेत.
महावितरणकडून पाठविण्यात आलेली एप्रिल महिन्याची सरासरी युनिटस् या बिलांमध्ये वगळण्यात येत आहेत. ग्राहकांनी एप्रिलची सरासरी वीज बिले भरली असल्यास त्यातील स्थिर आकार वगळता उर्वरित रक्कमसुद्धा मे महिन्याच्या बिलांमध्ये समायोजित करून स्लॅब बेनिफिट देण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये महावितरणने 23 मार्चपासून ग्राहकांकडे जाऊन मीटर रीडिंग घेण्याचे काम तात्पुरते बंद केले आहे. रीडिंग्ज उपलब्ध नसल्याने ग्राहकांना सरासरीनुसार बिले पाठविण्यात येत आहेत; परंतु महावितरणची वेबसाइट व मोबाइल ऍपद्वारे ग्राहकांना स्वत: मीटर रीडिंग घेऊन त्याचे फोटो पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे. वीज वापराची अचूक बिले तयार करण्यासाठी जास्तीत जास्त ग्राहकांनी मीटर रीडिंगचे फोटो पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.