पाकिस्तानी तस्करांनी टाकली होती 136 पाकिटे
भुज- कच्छच्या खाडीमध्ये पाकिस्तानातील अमली पदार्थांच्या तस्करांनी हेरोईनची पाकिटे टाकल्याच्या संशयावरून संयुक्त शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे. सीमा सुरक्षा दल, भारतीय तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांच्या संयुक्त पथकाच्यावतीने या खाडीमध्ये हा शोध घेतला जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या खाडीतून हेरोईनची 11 पाकिटे सापडली आहेत. त्यातील अमली पदार्थ आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधी रुपयांची होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
भारतीय तटरक्षक दलाच्या बोटीने 21 मे रोजी जेंव्हा या तस्करांच्या बोटीला पकडले तेंव्हा तस्करांनी ही पाकिटे समुद्राच्या पाण्यात फेकून दिली होती. तस्करांच्या बोटीमध्ये अमली पदार्थांची 330 पाकिटे होती. त्यातील 136 पाकिटे समुद्रात फेकून देण्यात आली. त्यापैकी 11 पाकिटे समुद्रकिनाऱ्यावर वहात आल्याने सापडली, असे महसूल गुप्तचर विभागाने सांगितल्याचे सीमा विभागाचे पोलिस महानिरीक्षक डी.बी.वाघेला यांनी सांगितले.
गुजरातमधील जखाऊ बंदराजवळ 21 मे रोजी केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या 6 तस्करांना अटक करण्यात आली होती.