पालिकेतील महत्त्वाच्या पदांबाबत माजी महापौर काकडे यांची मागणी
पुणे – महापालिकेतील महत्त्वाच्या पदावरील अधिकारी निवृत्त होण्याआधी सहा महिने ही जागा भरतीची प्रक्रिया करावी. मात्र, तसे केले जात नाही. या पदावर तात्पुरत्या स्वरूपात येणाऱ्या व्यक्तीला काही माहिती नसेल तर त्या विभागाचा कारभार ठप्प होऊ शकतो. नगरसचिव कार्यालयाचा हाच प्रकार होणार आहे. त्यामुळे कायमस्वरूपी या जागेवर भरती होईपर्यंत सद्याच्या नगरसचिवांना मुदतवाढ द्यावी, असे पत्र माजी महापौर अंकुश काकडे यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.
पुणे महानगरपालिकेचे नगरसचिव दि.31 ऑगस्टला निवृत्त होत आहेत ही जागा महापालिकेला रिकामी ठेवता येत नाही.
सध्या, या जागेवर कामगार विभागाचे उपायुक्त शिवाजी दौंडकर यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. वास्तविक नगर सचिव हे पद अतिशय महत्त्वाचे पद आहे त्या पदाला स्वतंत्र अधिकार आहे. नव्या व्यक्तीला तेथील कामकाजाची माहिती नसेल तर महापालिकेचा कारभार ठप्प होऊ शकतो, असे काकडे यांचे म्हणणे आहे.
महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी निवृत्त होण्याच्या तारखा निश्चित असतात ही पदे भरण्यासाठी 6 महिन्यांपासून प्रक्रिया सुरू करणे गरजेचे आहे, दुर्दैवाने महापालिकेत अशी प्रक्रिया वेळेत सुरू केली जात नाही ही वस्तुस्थिती आहे. आपण आपल्या कारकीर्दीत भविष्य काळामध्ये निवृत्त होणारे अधिकारी यांच्या जागा भरण्यासाठी वेळेत प्रक्रिया सुरू कराल, अशी अपेक्षाही या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.