पिंपरी – दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील विविध बाजारपेठांतून पूजा साहित्य, रांगोळी, माता लक्ष्मीची मूर्ती, झाडू, किल्ल्यांवरील खेळणी आदींची खरेदी नागरिकांनी सुरू केली आहे.
दिवाळी गुरुवारपासून (दि. 12) सुरू होत आहे. गुरुवारी वसुबारस, शुक्रवारी धनत्रयोदशी, शनिवारी लक्ष्मीपूजन, सोमवारी दिवाळी पाडवा असणार आहे. दिवाळीच्या कालावधीत पूजेसाठी आवश्यक पूजा साहित्य सध्या बाजारपेठेत दाखल झालेले आहे.
धुप, अगरबत्ती, दीप, लक्ष्मी मातेची मूर्ती, लाह्या-बत्ताशा, झाडू, हळद व कंकूच्या पुड्या, कापुर आदी पूजा साहित्याची खरेदी करण्यात येत आहे. त्याशिवाय, दिवाळीच्या कालावधीत दररोज घरोघरी आवर्जून काढण्यात येणाऱ्या विविधरंगी रांगोळीची देखील खरेदी सुरू झाली आहे.
दिवाळीनिमित्त घरातील लहानथोर आवर्जून नवे कपडे घालतात. शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, दापोडी अशा विविध भागांतील बाजारपेठांमध्ये कपड्यांची खरेदी करताना नागरिक दिसत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कापड व्यावसायिकांनी विविध आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत.
दिवाळीमध्ये बच्चे कंपनीकडून घराजवळ किल्ले बांधले जातात. किल्ल्यांवर ठेवण्यासाठी मातीतील खेळण्यांना मागणी असते. मुलांसाठी मातीतील मावळे, किल्लेदार व अन्य खेळणी विकत घेतली जात आहेत. त्याशिवाय, कुटुंब, मित्र परिवार आणि नातेवाइकांना देण्यासाठी आवर्जून मिठाई, सुका मेवा आणि तयार फराळाच्या पदार्थांची खरेदी करण्यात येत आहे. विविध डिझाईनमधील आकाशकंदील आणि पणत्या घेण्यासाठी देखील नागरिकांची लगबग सुरू आहे.