हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि गुणी कलाकार सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी यानिमित्ताने हिंदी चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीवर बोट ठेवण्यात येत आहे. नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावत हिने सुशांतसिंहच्या मृत्यूनंतर प्रतिक्रिया देताना या विषयाला तोंड फोडले आणि त्यानंतर विविध समाज माध्यमांमध्ये आणि इतर माध्यमांमध्येही बॉलीवूडमधील घराणेशाहीवर चर्चा जोर धरू लागली आहे.
या घराणेशाहीच्या वादात आता अभिनेत्री श्रुती हसन हिने देखील उडी घेतली आहे. तुम्हाला सिनेउद्योगातील घराणेशाही दिसते पण इतर व्यवसायांमधील नाही, असं प्रत्युत्तर तिने टीकाकारांना दिलं आहे.
ती म्हणाली,’प्रत्येक क्षेत्रात घराणेशाही आहे. टीका करणारी मंडळी इतर व्यवसायांवर प्रश्न उपस्थित करत नाही. टीकाकारांना केवळ सिनेउद्योगातीलच घराणेशाही दिसते. स्टार किड्सला देखील इतर कलाकारांप्रमाणे टिकून राहण्यासाठी मेहनत करावी लागते. इंडट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी स्टार किड्सला देखील तितकीच मेहनत करावीच लागते. कारण ओळखीवर सुरुवातीला एक दोन चित्रपट मिळतात पण ते जर फ्लॉप झाले तर कोणीही काम देत नाही.’