कार्यकाळ संपत आल्याने मंजुरीचा धडाका : बैठकीत 116 कोटींच्या खर्चाला मान्यता
पिंपरी – स्थायी समितीने पुन्हा एकदा कोटींची उड्डाणे घेण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक बुधवारी (दि. 15) पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती विलास मडेगिरी होते. या बैठकीमध्ये 116 कोटी 51 लाख 31 हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. सभापती मडेगिरी यांचा स्थायी समिती सभापती पदाचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यामध्ये संपणार आहे. त्यामुळे कमीत-कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त विषय मंजूर करण्याचा धडाका सभापतींनी लावला आहे.
स्थायी समितीच्या बुधवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये रस्ते, ड्रेनेज, जलवाहिन्यांची दुरुस्ती तसेच शिक्षण विभागाशी निगडीत खरेदीच्या विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये रस्ता दुरुस्तीच्या कामावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 6 मधील गुळवेवस्ती व परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी 23 लाख 54 हजार रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. इंद्रायणीनगर येथील तिरुपती चौकातील डीपी रस्ता विकसित करण्यात येणार आहे. यासाठी 6 कोटी 82 लाख 58 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. सांगवी परिसरातील रस्ते अत्याधुनिक पद्धतीने विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या 3 कोटी 37 लाख 59 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
त्याच भागातील क्रांती चौक ते शनि मंदिर हा रस्ताही विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी 3 कोटी 29 लाख 18 हजार रुपये खर्च येणार आहे. प्रभाग क्रमांक 22 मधील ज्योतिबानगर येथील बाजीप्रभू चौक ते तापकीरमळा या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यासाठी 5 कोटी 41 लाख 90 हजार रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे. यासोबतच प्राधिकरण येथील गंगानगर भागातील रस्त्यांचेही कॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 5 कोटी 75 लाख 1 हजार रुपये खर्च येणार आहे.
चिंचवड येथील दुर्गा कॉर्नर ते प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह हा रस्ता सुधारविण्यात येणार आहे. त्यासाठी 6 कोटी 58 लाख 34 हजार रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. सांगवी येथील ढोरे फार्म ते फेमस चौक रस्ता विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी 3 कोटी 37 लाख 85 हजार रुपये खर्च केला जाणार आहे. तसेच संत तुकाराम नगर येथील उपरस्ते विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी 3 कोटी 29 लाख 38 हजार रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.
याव्यतिरिक्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या रेफ्रिजरेशन एयर कंडिशनिंग मॅकेनिक या व्यवसायाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी 4 कोटी 70 लाख 22 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. चिखली येथील शेलारवस्ती व सोनवणेवस्ती परिसरातील जलनिसारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.
त्यासाठीच्या 55 लाख 4 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच चऱ्होली येथील मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत चिखली गावठाण, कुदळवाडी, पवारवस्ती येथील जुन्या मलनिसारण नलिका बदलण्यात येणार आहे. त्यासाठी 74 लाख 98 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये शंभर कोटींचा टप्पा ओलांडत 116 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
सभापतींची अधिकाऱ्यांशी दिलजमाई
स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी यांचा सभापती पदाचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यामध्ये संपणार आहे. त्यामुळे सभापतींनी विषय मंजुरीचा धडका लावला आहे. पाच आठवडे कार्यकाळ राहिल्याने सभापतींनी अधिकाऱ्यांशी चांगलेच मिळतेजुळते घेतले आहे. नवीन वर्षाच्या दिवशीही स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सभापतींनी सर्वांना गुलाबाचे फूल देत शुभेच्छा दिल्या होत्या. तर बुधवारी झालेल्या बैठकीत सभापतींनी सर्वांना फूल व तिळगूळ देत संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या.