Telangana | Rahul Gandhi – तेलंगणातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या निर्णयावर त्या राज्यातील कॉंग्रेस सरकारने शिक्कामोर्तब केले. त्या निर्णयाचे स्वागत करताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी जे बोललो; ते करून दाखवलं, अशी प्रतिक्रिया दिली.
तेलंगणाचे मुख्यमंत्री ए.रेवंथ रेड्डी यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, शेतकऱ्यांनी १२ डिसेंबर २०१८ ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीत घेतलेले २ लाख रूपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे.
त्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीवर ३१ हजार कोटी रूपयांचा भार पडेल. तेलंगणात मागील वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी कॉंग्रेसने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते.
त्या राज्याची सत्ता हस्तगत करणाऱ्या कॉंग्रेसच्या सरकारने आता आश्वासनपूर्तीच्या दिशेने पाऊल उचलले आहे. त्या घडामोडीवर राहुल यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया देताना तेलंगणातील शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.
शेतकरी आणि कामगारांसह वंचित समाजाला मजबूत करण्यासाठी राज्याचा खजिना खर्च होण्याची गॅरंटी म्हणजे कॉंग्रेस सरकार. देशाचा पैसा भांडवलदारांवर नव्हे; तर देशवासीयांवर खर्च करणे हे कॉंग्रेसचे आश्वासन आहे, असे त्यांनी म्हटले.