वडिलोपार्जित मालमत्ता वाटप गैरप्रकाराला बसणार आळा
पुणे – वडिलोपार्जित मालमत्ता जर एकाच मुलाला द्यायची असेल तर आता त्यावर पाच टक्के मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) भरावे लागणार आहे. याविषयी कायद्यात आवश्यक ती तरतूद केली जाणार असून याविषयीचा प्रस्ताव नोंदणी विभागाने राज्य शासनाकडे पाठविला आहे. यामुळे एकच मुलगा जर अन्य भावांना-बहिणींना डावलून वडिलोपार्जित मालमत्ता बक्षीसपत्राद्वारे स्वत:च्या नावावर करत असेल तर अशा गैरप्रकाराला आळा बसणार आहे. दरम्यान, जर वडिलांना मालमत्ता मुलांमध्ये समान पद्धतीने वाटप करायची असेल तर त्यासाठी 200 रुपयांच्या स्टॅम्पवर हा व्यवहार होणार आहे.
वडिलोपार्जित मालमत्तेचे समान वाटप होणे अपेक्षित आहे. अनेकदा त्यांचे समान वाटप होत नाही. भाऊ आणि बहिणींचे हक्क डावलले जातात. दोनशे रुपयांमध्ये बक्षीसपत्र करून अनेकदा एखादा भाऊ वडिलोपार्जित मालमत्ता आपल्या नावावर करून घेतो. त्यातून वाद निर्माण होतो. हा विषय न्यायालयापर्यंत जातो.
न्यायालयीन दाव्यांची संख्यादेखील त्यातून वाढते आहेत. या सर्व प्रकाराला आळा बसावा, घरातील वाद मिटवावेत, यासाठी राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने यासंदर्भात कायद्यात दुरुस्ती करून वडिलोपार्जित मालमत्ता एकाच मुलांच्या नावावर बक्षीसपात्र करावयाची असेल, तर त्यासाठी मालमत्तेच्या रेडी-रेकनरमधील दराच्या पाच टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात यावा, अशी दुरुस्ती कायद्यात प्रस्तावित केली आहे.
त्यामुळे कुटुंबातील अन्य सदस्यांना डावलून सर्व मालमत्ता हवी असल्यास, त्या मालमत्तेचा रेडी-रेकनरमध्ये जो दर आहे. त्या दराच्या पाच टक्के मुद्रांक शुल्क भरावे लाभणार आहे.