व्यापारी संकुलाच्या कारभारात अफरातफर; कर्मचारी निलंबीत

कोपरगांव: शहरातील नव्या कै.बाबुलाल भिलाजी वाणी व जय तुळजाभवानी व्यापारी संकुलाच्या कारभारात अफरातफर केल्यामुळे कर्मचाऱ्याला निलंबीत केले आहे. पालिकेला अंधारात ठेवून मोघम स्वरुपाची व अपूर्ण माहिती देवून नगरपालिकेचे मार्केट विभागातील लिपिक सोपान शिंदे यांनी गाळयाच्या व्यवहारात लाखो रुपयाची अफरातफर केली. त्यामुळे पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी शिंदे यांना 15 नोव्हेंबर पासून तडकाफडकी निलंबीत केले.

दरम्यान या प्रकरणी उपमुख्याधिकारी सुनिल गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा जणांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. दोन्ही संकुलातील गाळयाच्या व्यवहारांची चौकशी करुन त्याचा अहवाल पंधरा दिवसात मुख्याधिकारी यांना सादर करणार आहेत, अशी माहिती उपमुख्याधिकारी गोर्डे यांनी दिली.

सोपान शिंदे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून पालिका प्रशासनाला अंधारात ठेवून शहरातील 17 व्यापारी संकुलातील 650 गाळयांच्या आर्थिक व्यवहारात सुसूत्रता ठेवली नाही. त्यांच्याबद्दल नागरीकांमध्ये अनेकवेळा तक्रारी आल्यानंतर अखेर मुख्याधिकारी सरोदे यांनी शिंदे यांचेवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांच्याकडून किती लाखाची अपहार झाला आहे याची सखोल चौकशी करण्यासाठी उपमुख्याधिकारी सुनिल गोर्डे, कर अधिकारी श्‍वेता शिंदे, स्थापत्य अभियंता दिगंबर वाघ,सहाय्यक लेखापाल तुषार नालकर,लिपिक राजेश गाढे, लिपिक चंद्रकांत साठे यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

दोन व्यापारी संकुलातील गाळयांच्या व्यवहाराची माहिती नगरपालिका प्रशासनाला शिंदे यांनी 16 जानेवारी 2019 पासून मागितलेली माहिती देण्याचे टाळले हे सिद्ध झाले आहे. बर्‍याच वेळा शिंदे यांनी माहिती देण्यासाठी मुदतवाढ मागितली परंतु त्यांनी माहिती देण्यास अखेर पर्यंत टाळले. दि 8 नोव्हेंबर रोजी या सर्व प्रकरणी शिंदे यांना अंतिम कारणा दाखवा नोटीस बजावण्यात आली मात्र त्या नोटीसीची दखल शिंदे यांनी घेतली नाही त्यानंतर ते विनापरवानगी कार्यालयात 11 नोव्हेंबर पासून भ्रमणध्वनी बंद ठेवून गैरहजर राहुन संपर्क तोडला आहे. त्यामुळे शिंदे यांनी व्यापारी संकुलाच्या गाळयात अफरातफर केल्याचा संशय बळावला आहे.

तुळजाभवानी व्यापारी संकुलाच्या एकूण 31 गाळयांपैकी 10 गाळयांचा लिलाव दिड महिन्यापूर्वी मुख्याधिकारी सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. दोन गाळयांचा लिलाव करणे बाकी आहे उर्वरित गाळयांच्या व्यवहारात शिंदे यांनी अफरातफर करुन झालेल्या व्यवहाराची रक्कम,करारनामा,अनामत याबाबतची अधिकृत माहिती पालिकेकडे सादर केलेली नाही. र्इ लिलावात सुद्धा अफरातफर झाल्याचे प्रथमदर्शनी दिसुन येत आहे. तसेच कै.बाबु भिला वाणी (फ्रुट मार्केट) व्यापारी संकुलातील 32 ओटे 30 गाळे व 20 ऑफिसेस बांधलेले असून त्यापैकी 20 ओटे 10 गाळे व 20 ऑफिसेस शिल्लक आहेत याही गाळयामध्ये लाभार्थींनी जे गाळे ताब्यात घेतले त्याची कुठलीही अधिकृत माहिती शिंदे यांनी पालिका प्रशासनाला सादर केलेली नाही. या दोन्हीही व्यापारी संकुलातील गाळा धारकांना गेल्या तिन वर्षापासून सोपान शिंदे यांच्या बेजबाबदारपणामुळे कोणतेही भाडे आकारता आलेले नाही त्यामुळे लाखो रुपयांचे पालिकेचे नुकसान होत आहे.

या सर्व प्रकरणी प्रथमदर्शनी शिंदे यांनी मोठी अफरातफर केल्याचे निदर्शनांस येत असल्याने त्यांना आजपासून निलंबीत करण्यात आले असून त्यांनी पंधरा दिवसात पालिकेला व नेमलेल्या समितीला सहकार्य करण्याची निलंबन काळात पालिकेच्या परवानगीशिवाय बाहेर न जाण्याचे आदेश मुख्याधिकारी सरोदे यांनी दिली आहे शिंदे यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे नगरपालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान मार्केट विभागाने या संदर्भात नागरीकांना आवाहन केले आहे की यापुढे पालिका कर्मचार्‍यांना आर्थिक व्यवहाराची कोणतीही रक्कम देतांना पावती घ्यावी व यापूर्वी सोपान शिंदे यांचे बरोबर कांही व्यवहार केला असल्यांस त्याची माहिती पालिका प्रशासनास कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.