पुणे – समर्थ काळभोरच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर रमणबाग संघाने येथे होत असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे, वसंतदादा सेवा संस्था आणि स्टेडियम क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “स्टेडियम क्रिकेट करंडक अजिंक्यपद’ स्पर्धेत सलग दोन विजयांची नोंद केली.
स.प. महाविद्यालय मैदानावर झालेल्या 14 वर्षाखालील गटाच्या सामन्यात रमणबाग संघाने पुना लायन्स् संघाचा 9 गडी राखून सहज पराभव केला. पुना लायन्स् संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 25 षटकात 5 गडी गमावून 136 धावांचे आव्हान उभे केले. भार्गव पाठक याने 53 धावांचे योगदान देत संघाच्या डावाला आकार दिला. रमणबाग इलेव्हनने ही धावसंख्या 18.3 षटकात व 1 गडी गमावून पूर्ण केली. समर्थ काळभोर याने जबाबदारीने खेळ करत नाबाद 69 धावा फटकावल्या.
समर्थ याने स्वप्निल जयभय (33 धावा) याच्यासह पहिल्या गड्यासाठी 100 चेंडूत 115 धावांची भागीदारी करून संघाचा विजय सोपा केला. 16 वर्षाखालील गटाच्या सामन्यातही समर्थ याची अष्टपैलू कामगिरी संघाच्या मदतीस आली आणि रमणबाग इलेव्हनने स्टेडियम क्रिकेट क्लबचा 50 धावांनी सहज पराभव केला. समर्थ काळभोर याच्या 58 धावा, मानस कोंढरे 23 धावा आणि ओजस भाटवडेकरच्या 33 धावांच्या जोरावर रमणबाग संघाने 25 षटकात 7 गडी गमावून 160 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना स्टेडियम क्लब अ संघाचा डाव 21.1 षटकात 110 धावांवर संपुष्टात आला. यश तुंगे (40 धावा), प्रेम गव्हाणे (21), नील शहा (14) यांची खेळी स्टेडियम संघाचा पराभव वाचवू शकली नाही.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
गटसाखळी फेरी ः 14 वर्षाखालील गट ः पुना लायन्स – 25 षटकांत 5 बाद 136 (भार्गव पाठक 53, आदित्य लडकत 11, अभिषेक कुलकर्णी 11, कैवल्य उभे 1-5) पराभूत वि. रमणबाग इलेव्हनः 18.3 षटकांत 1 गडी बाद 139 (समर्थ काळभोर नाबाद 69, स्वप्निल जयभय 33, साहील अभंग नाबाद 10, भार्गव पाठक 1-16)
16 वर्षाखालील गट ः रमणबाग इलेव्हन ः 25 षटकांत 7 बाद 160 (समर्थ काळभोर 58, ओजस भाटवडेकर 33, मानस कोंढरे 23, राजेश गरूवा 3-34) वि.वि. स्टेडियम क्रिकेट क्लब अः 21.1 षटकांत सर्वबाद 110 (यश तुंगे 40, प्रेम गव्हाणे 21, नील शहा 14, समर्थ काळभोर 3-16, साहील अभंग 1-6).