स्टेडियम क्रिकेट कप अजिंक्यपद स्पर्धा 2019
पुणे – ओम क्रिकेट ऍकॅडमी आणि स्टेडियम क्रिकेट क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून येथे होत असलेल्या स्टेडियम क्रिकेट करंडक अजिंक्यपद स्पर्धेत आगेकूच केली. स.प. महाविद्यालय मैदानावर झालेल्या 12 वर्षाखालील गटाच्या सामन्यात रणंजय देशमुख याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर ओम क्रिकेट ऍकॅडमी संघाने स्टेडियम क्रिकेट क्लबचा 9 गडी राखून सहज पराभव केला.
स्टेडियम संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 30 षटकात 99 धावा जमविल्या. ओम संघाच्या रणंजय देशमुख (3-15), प्रेम जाधव (3-12) आणि निश्चय ओझा (2-9) यांनी चमकदार गोलंदाजी केली. हे आव्हान ओम संघाने 18.5 षटकात आणि 1 गडी गामवून पूर्ण केले.
दुसऱ्या सामन्यात 6 धावात 4 गडी बाद अशी कामगिरी करणार्या राजेश गुरूवा याच्या कामगिरीमुळे स्टेडियम क्रिकेट क्लबने परब क्रिकेट क्लबचा 44 धावांनी सहज पराभव केला. आपल्या पहिल्या पराभवातुन शिकत स्टेडियम संघाने या सामन्यात तीनही क्षेत्रात उत्तम कामगिरी करून विजय मिळवला.
तर, 14 वर्षाखालील गटाच्या सामन्यात ओम साळुंखेच्या नाबाद 106 धावांच्या जोरावर ओम क्रिकेट ऍकॅडमीने परब क्रिकेट ऍकॅडमीचा 125 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना ओम संघाने 22 षटकात 1 गडी गमावून 190 धावा चोपल्या. ओम साळुंखे याने 61 चेंडूत 5 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 106 धावा काढल्या. ओमने अर्थव ढोरे (43 धावा) याच्यासह पहिल्या गड्यासाठी 130 धावांची भागिदारी करून मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. परब स्पोर्टस् ऍकॅडमीचा डाव 19.4 षटकात व 65 धावांवर संपला.
16 वर्षाखालील गटाच्या सामन्यात यश तुंगे याच्या नाबाद 104 धावांच्या जोरावर स्टेडियम क्रिकेट क्लबने पुणे वॉरीयर्सचा 73 धावांनी पराभव केला. यश आणि साहील नाईक (नाबाद 53 धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर स्टेडियम संघाने 20 षटकात बिनबाद 177 धावा चोपल्या. यश आणि साहील यांनी नाबाद फलंदाजी करताना 120 चेंडूत 177 धावांची बिनबाद भागिदारी करून संघाच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला.