स्टेडियम क्रिकेट कप अजिंक्यपद’ स्पर्धा 2019
पुणे – यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे, वसंतदादा सेवा संस्था आणि स्टेडियम क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “स्टेडियम क्रिकेट करंडक अजिंक्यपद’ स्पर्धेच्या 16 वर्षाखालील गटाच्या पुना वॉरीयर्स आणि राजपुत क्रिकेट ऍकॅडमी या दोन्ही संघातील सामना टाय झाला.
स.प. महाविद्यालय मैदानावर झालेल्या 16 वर्षाखालील गटात अतितटीच्या झालेला पुना वॉरीयर्स आणि राजपुत क्रिकेट ऍकॅडमी सामना बरोबरीत सुटला. उत्कंठावर्धक झालेल्या या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पुना वॉरीयर्सने 24 षटकात 7 गडी गमावून 172 धावा केल्या. अंकित सिकारवर (37 धावा), हृतिक उत्तेकर (23), आदित्य कुंभार (21) आणि गौरव खांडवे (20) यांच्या खेळीच्या जोरावर पुना वॉरीयर्सने 170 धावांचा टप्पा पार केला.
षटकामागे 7.16 सरासरी धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या राजपुत क्रिकेट ऍकॅडमीने चांगली सुरूवात केली होती. साहील छाजेड (67 धावा) आणि साहील राजपुत (33 धावा) यांनी दुसर्या गड्यासाठी 57 चेंडूत 70 धावा जमविल्या. पण डावाच्या मध्यावर राजपुत संघाने सामन्यावरची पकड गमावली. त्यांचे फलंदाज मोक्याच्या क्षणी बाद झाले व राजपुत संघाने 24 षटकात 4 गडी गमावून 172 धावा केल्या व सामना बरोबरीत सुटला.
तर, 12 वर्षाखालील गटात वेदांत थिटे याच्या गोलंदाजीच्या जोरावर स्टेडियम क्रिकेट क्लब ब संघाने स्टेडियम क्रिकेट क्लब अ संघाचा 6 गडी राखून पराभव करून आगेकूच केली. 14 वर्षाखालील गटाच्या सामन्यात तनिष्क परब याच्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर परब क्रिकेट ऍकॅडमीने पुणे पॅन्थर्स संघाचा 4 गडी आणि 2.5 षटके राखून सहज पराभव केला. याच गटाच्या दुसर्या सामन्यात राजपुत क्रिकेट ऍकॅडमीने पुना लायन्स् संघाचा 3 गडी राखून पराभव केला.