वाहतूक विस्कळीत : मोरवाडी चौकातील प्रकार
पिंपरी – जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील मोरवाडी चौकातील अहिल्यादेवी होळकर ग्रेड सेपरेटरमध्ये एक कंटेनर अडकला. ही घटना सोमवारी (दि.3) दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान कंटेनर अडकल्याने मुख्य मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व्हिस रस्त्याने वाहतूक वळवली.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडीकडून पिंपरीच्या दिशेने जात असलेला कंटेनर चालकाने मुख्य रस्त्यावर दिलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष करुन कंटेनरची उंची जास्त असतानाही मुख्य मार्गावरुन नेला. दरम्यान हा कंटेनर मोरवाडी येथील अहिल्यादेवी होळकर ग्रेड सेपरेटरमधून जात असताना अडकला. कंटेनरची उंची जास्त असल्याने कंटेनर बाहेर निघण्यासही अडचण निर्माण होत होती. दरम्यान मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व वाहतूक पर्यायी रस्त्याने सुरु केली. मात्र तोपर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
सर्व्हिस रस्त्यावरही कोंडी मुख्य मार्गावर कंटेनर अडकल्याने तेथील वाहतूक सर्विहस रस्त्यावर वळवण्यात आली. मेट्रोचे काम सुरू असल्याने सर्विस रस्ताही अरुंद आहे. त्यात मुख्य मार्गावरील वाहनेही सर्विस रस्त्यावरून जात असल्याने वाहतूक कोंडी झाली होती. कंटेनर ग्रेड सेपरेटर मधून बाहेर निघाल्यानंतर काही वेळाने वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. परंतु वारंवार कंटेनर अडकण्याचे प्रमाण वाढत असल्याने यावर कायमस्वरुपी उपाययोजनेची गरज आहे.