विधानसभा निवडणूक मतदानावर एसटी कर्मचारी ‘बहिष्कार’ टाकणार

पुणे – राज्य परिवहन महामंडळातर्फे (एसटी) पुण्यातील एसटी कर्मचाऱ्यांना बजावण्यात आलेल्या नोटीसबाबत नाराजी व्यक्‍त करत, एसटी कर्मचारी संघटनेने आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील निवेदन गुरूवारी (दि.18) जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे सदस्य गजानन कच्छवे यांनी दिली.

कच्छवे म्हणाले की, एसटीचे कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचारी एसटी महामंडळाचे शासनात विलनीकरण व्हावे, या मागणीसाठी संपावर जाण्याची कायदेशीर नोटीस महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली होती. राज्यातील एसटी महामंडळाच्या तब्बल 70 ते 80 आगारातील कर्मचारी संपावर गेले असतानाही पुणे येथील स्वारगेट आगारातील कर्मचाऱ्यांनी गर्दीच्या वेळी संप न पुकारता सात नोव्हेंबरच्या मध्यरात्री पासून संपावर जाण्याची नोटीस देवून संप पुकारला आहे, असे असताना 11 नोव्हेंबरला आगार व्यवस्थापकांकडून काही कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. शासनाच्या या आडमुठ्या धोरणास विरोध करण्याकरिता आणि आमच्या मागणीची पूर्तता होत नसल्याने 390 कर्मचारी आणि त्यांची कुटुंबीय हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालणार आहोत.

बंद सुरूच…
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बंद गुरूवारी (दि.18) देखील सुरू होता. या दरम्यान एसटी महामंडळातर्फे अंशत: प्रवासी सुविधा सुरू असून, महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी शिवाजी नगर येथून नाशिकसाठी 12 बसेस, औरंगाबादसाठी 9 बसेस, पुणे स्टेशन येथून दादर करिता 14 बसेस, स्वारगेट येथून सांगलीसाठी 3, मिरज 3, ठाणे 9, दादर 8, बारामतीसाठी 2 अशा एकूण 58 बसेस धावल्या. या बसेसमधून एकूण 1290 प्रवाशांनी प्रवास केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.