उच्च न्यायालयाचा आदेश धुडकावून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी राज्यातीलएसटी कर्मचाऱ्यांचे वेगवेगळ्या एसटी डेपोच्या ठिकाणी काम बंद आंदोलन सुरु होते. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या कृती समितीशी चर्चा करत काही मागण्या मान्य केल्या तर काही मागण्यांबाबत दिवाळीनंतर चर्चा करु असे आश्वासन दिले. तेव्हा आंदोलन मागे घेत असल्याचे कर्मचारी कृती समितीने जाहिरही केले. तरीही अनेक एसटीच्या डेपोमध्ये काम बंद आंदोलन कर्मचाऱ्यांचे सुरुच राहीले. या आंदोलनाला भाजपच्या नेत्यांनीही उघडपणे पाठिंबा दिला.

‘संघर्ष एसटी कामगार संघटना’ आणि ‘महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटना’ या दोन संघटनांनी बुधवारी रात्रीपासून संप करणार असल्याची नोटीस एसटी महामंडळाला दिली. तेव्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत या नोटीशीला आव्हान देण्यात आले. यावर आज सकाळीच अंतरिम आदेश देत न्यायालयाने या संपाला मनाई केली.

असे असताना एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन राज्यात अनेक ठिकाणी सुरु आहे. एसटी महामंडळाचे राज्यात २५० डेपो असून आज आंदोलनामुळे ५० पेक्षा जास्त डेपोतून एकही एसटी बाहेर पडली नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु राहिल्याने आज रात्रीपासून खरोखर संप केला जातो का याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

ऐन दिवाळीतल्या आंदोलनामुळे एसटी प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे. सरकारकडून न्याय मिळत नसल्याच्या कारणावरुन काही एसटी कर्मचाऱ्यांनी या आंदोलन काळात आत्महत्या केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे. तेव्हा आज रात्रीपासून संप झाला तर दिवाळीनंतर संबंधित एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.