डिझेलअभावी थांबली एसटीची चाके

वडूज आगारातील परिस्थिती; प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे हाल

वडूज – भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमीटेडकडून (बीपीसीएल) डिझेलचा होणारा पुरवठा बंद झाल्याने खटाव तालुक्‍यातील वडूज आगारातील एसटी बसेस गेल्या दोन दिवसांपासून उभ्याच आहेत.

डिझेलअभावी एसटीच्या फेऱ्या बंद असल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाला भारत पेट्रोलियम कार्पोरशन लिमीटेडकडून (बीपीसीएल) डिझेलचा पुरवठा केला जातो. राज्य परिवहन महामंडळाने “बीपीसीएल’ची थकबाकी न भरल्याने डिझेलचा पुरवठा बंद झाल्याचे समजते. विभाग नियंत्रक यांच्याकडून जिल्ह्यातील काही आगारांना कमी प्रमाणात डिझेलचा पुरवठा झाला आहे.

वडूजबरोबरच महाबळेश्‍वर, मेढा या आगारांनाही डिझेल टंचाईचा सामना करावा लागत आहे. नियमीतपणे येणारा डिझेलचा टॅंकर बंद झाल्याने आगारापुढे डिझेलचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे उपलब्ध असणाऱ्या डिझेलवरच गेली दोन दिवस एसटी बसेस धावल्या. गुरूवार, 19 रोजी मात्र बहुतांशी एसटी बसेस डिझेलअभावी आगारातच उभ्या होत्या. एरव्ही नियमीतपणे धावणारी चाके जागेवरच थांबली होती. आगारातून दररोज 248 फेऱ्या होतात. त्यापैकी 19 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या. वडूज – सातारा, वडूज- कराड, वडूज-पुणे अशा काही महत्वाच्या फेऱ्याच सुरू होत्या. तर परिसरातील ग्रामीण भागांतील फेऱ्या बंद राहिल्याने प्रवाशी व विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत होती.

वरीष्ठ कार्यालयाच्या सुचनेनुसार दहिवडी आगारातून या बसेसमध्ये डिझेल भरून वडूज आगारातून होणाऱ्या ग्रामीण भागातील फेऱ्या सुरळीत करण्याचा प्रयत्न आगार व्यवस्थापनाचा दिसून येत होता. तर लांब पल्ल्यावर धावणाऱ्या एसटी बसेसना सातारा, कराड, दहिवडी, कोरेगाव, पारगाव खंडाळा या ठिकाणच्या आगारातून डिझेल भरण्यास सांगण्यात आले.

डिझेल टंचाई असली तरी त्या त्या मार्गावरील आगारांतून डिझेल उपलब्ध करून महत्वाच्या शहरी फेऱ्या सुरु आहेत. तसेच दहिवडी आगाराकडून डिझेल उपलब्ध करून येथील ग्रामीण फेऱ्या मार्गस्थ करून विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. वरिष्ठ कार्यालय व “बीपीसीएल’ यांच्यात लवकरच तोडगा निघून प्रवाशांची गैरसोय थांबविली जाईल.

व्ही. डी. माने आगार व्यवस्थापक, वडूज.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.