वाहतूक सुरू झाल्याच्या आठवड्याभरात लाखो प्रवाशांकडून लाभ
एसटीला 90 लाखांहून अधिक उत्पन्न
पुणे – करोनामुळे बंद असणारी महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाची “सुपरफास्ट’ सेवा पुन्हा एकदा मार्गावर येत आहे. मागील आठवड्यापासून आंतरजिल्हा आणि जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरू झाली. या कालावधीत लाखो नागरिकांनी प्रवास केला असून, याद्वारे एसटीला सुमारे 90 लाखांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे.
एसटीची तालुका, जिल्हा आणि आंतरजिल्हा सेवा अनलॉकमध्ये टप्प्याटप्प्याने सुरू झाली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुण्यातूनदेखील गाड्या धावत आहे.
एसटीच्या पुणे विभागामध्ये 21 ते 28 ऑगस्ट या कालावधीत 213 मार्गांवर गाड्या येत असून, यांतर्गत दररोज 850 फेऱ्या होत आहेत. या कालावधीत एसटी सुमारे 4 लाख 94 हजार किलोमीटर धावली. यातून 1 लाख 21 हजार 918 जणांनी प्रवास केल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.
93.17 लाखांचे उत्पन्न
मार्चपासून एसटीची प्रवासी सेवा बंद होती. त्यामुळे उत्पन्नातदेखील तोटा होत होता. मात्र, ही तूट भरून काढण्यासाठी एसटीकडून मालवाहतूक सुरू केली. अनलॉकमध्ये नियमांना शिथिलता दिल्यामुळे एसटीची चाके पुन्हा धावण्यास सुरू झाली. 21 ते 28 ऑगस्ट या कालावधीत एसटीला तब्बल 93.17 लाखांचे उत्पन्न मिळाल्याने हळूहळू तोट्यातील लालपरीची वाटचाल नफ्याकडे सुरू असल्याचे चित्र आहे.
प्रवाशांची संख्या पाहून फेऱ्यांमध्ये वाढ
सध्या पुणे येथून ठाणे, बोरिवली, दादर, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, शिर्डी, नगर, कोल्हापूर, सांगली, मिरज, सोलापूर, बारामती, भोर, सासवड, इंदापूर, आळेफाटा, शिरूर, भिमाशंकर, सातारा, महाड, फौजी आंबवडे आदी मार्गांवर शिवनेरी, शिवशाही, सेमी आणि साध्या बसेस सोडण्यात येत आहेत. येत्या काळात प्रवाशांची संख्या वाढल्यास टप्प्याटप्प्याने सर्व मार्गांवरील फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत.