ST strike updates: संपाचा तिढा कायम, अनिल परब यांच्याकडून कडक कारवाईचा इशारा

मुंबई – राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत निर्णय घेतल्यानंतर संप मागे घेतला जाईल असे वाटत होते. मात्र आझाद मैदानावरील एसटी आंदोलक कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असून त्यांनी संप मागे घेण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचा-यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन करत कडक कारवाईचा इशारा दिला आहे. यामुळे यावर तोडगा न निघाल्यास आंदोलन चिघळण्याची शक्‍यता आहे.

राज्य सरकारने दिलेली वेतनवाढ व इतर मागण्यांवर घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. एसटी कामगारांनी उभारलेल्या लढ्याला मोठे यश आले असल्याचे सांगत पुढील निर्णय कामगारांनी घ्यावा, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. मात्र, आझाद मैदानावरील आंदोलन कर्मचारी हे विलिनीकरणावरच ठाम आहेत. वेतनवाढीच्या निर्णयानेही एसटी कर्मचारी संघटनांचे समाधान झालेले नाही. या संघटना विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. सरकारच्या निर्णयाबाबत चर्चा करून संपाबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनी सांगितले.

दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन केले आहे. तसेच जे संपात राहतील त्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.अनिल परब म्हणाले, राज्य सरकारने बुधवारी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. विलीनीकरणाच्या बाबतीत देखील सरकारने भूमिका मांडली. मागण्या मान्य झाल्यानंतर लढाई थांबवायची असते. मात्र काही कर्मचारी कामावर येण्यास तयार आहेत. जे कर्मचारी गावात आहेत त्यांनी आज कामावर यावे आणि जे मुंबईत आलेले आहेत त्यांनी उद्यापर्यंत कामावर यावे.

आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत किती कामगार कामावर आले कीती नाही, या गोष्टींचा अभ्यास करु, त्यानंतर महामंडळ पुढील निर्णय घेईल. जे कामगार विलीनीकरणावर ठाम आहेत. त्यांना मला सांगायच आहे मी वारंवार सांगत आहे ही मागणी हायकोर्टाने नेमलेल्या समितीसमोर आहे. त्याला 12 आठवड्याचा कालावधी दिलेला आहे. त्यामुळे 12 आठवडे संप करणे हे परवडणार नाही. कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.