एसटी संपाचा उद्योगनगरीला आर्थिक फटका

पदरमोड करुन कामगारांना गावाहून परत आणण्याची वेळ

पिंपरी  – गेली सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी संपाचा एमआयडीसीमधील लघु उद्योजकांना मोठा फटका बसला आहे. दिवाळीसाठी गावी गेलेले कामगार संपामुळे गावीच अडकल्याने त्यांना शहरात आणण्याचा नाहक आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.

 तर काही भागांमध्ये एसटीशिवाय दुसरा पर्याय नसल्याने कामगार गावाकडेच अडकले आहेत. दुसरीकडे बांधकाम क्षेत्रात मात्र शहरात उपलब्ध असलेल्या मनुष्यबळावर बांधकाम साईटस्‌चे काम नेहमीप्रमाणे सुरू असल्याचे चित्र आहे.

दिवाळीनिमित्त शहरातील कामगार व बांधकाम मजूर गावी गेले होते. दिवाळीच्या सुट्टया संपायला आणि एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु व्हायला एकच वेळ झाल्याने, या कामगारांचा पिंपरी-चिंचवड शहरात येण्याचा मार्गच बंद झाला.

रेल्वे सेवा उपलब्ध असलेल्या शहरानजीकच्या गावांमधील कामगार शहरात दाखल होऊन कामावरदेखील रुजू झाले आहेत. तर खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून दुप्पट तिप्पट भाड्याची मागणी केली जात असल्याने अनेक कामगार गावीच अडकले होते. ही बाब कामगारांनी कंपनी मालकांच्या निदर्शनास आणून दिली.

दिवाळीनंतर पुन्हा उद्योगाचे चाक सुरु होण्याकरिता या कामगारांना प्रवासी भाड्यासाठी अतिरिक्‍त रक्कम देण्याची तयारी दर्शविल्यानंतर हे कामगार शहरात दाखल झाले आहेत. उत्पादन प्रक्रियेत खंड पडू न देण्यासाठी उद्योजकांना हा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागला आहे. अगदी एक हजार रुपयांच्या प्रवासी भाड्याकरिता उद्योजकांना चार हजार रुपये कामगारांना द्यावे लागले आहेत.

बांधकाम क्षेत्राचे काम मात्र सुरू
बांधकाम क्षेत्रात यापेक्षाकाही वेगळे चित्र आहे. अनेक मजूर गावीच अडकले असले, तरीदेखील दिवाळीकरिता गावी न गेलेले मजूर आता बांधकामासाठी उपलब्ध झाल्याने शहरातील बांधकाम साईटस्‌चे काम सुरु असल्याचे चित्र आहे. तर काही ठिकाणी मजुरांना वाढवून मजुरी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.

अनेक कामगार अडकले
बहुतेक कामगार हे खासगी बस व इतर वाहनांनी शहरात परतत आहेत. परंतु राज्यातील काही दुर्गम भाग असे आहेत, जिथे केवळ एसटीच पोहचते. अशा भागात काही कामगार अडकले असल्याने त्याचा उत्पादन प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. या कामगारांना देखील नजीकच्या शहरात पोहचण्यास सांगून खासगी बसने आणण्याचे प्रयत्न उद्योजकांकडून सुरू आहेत. अनेकजण कुटुंबासोबत गेले असल्याने त्यांच्यासाठी गावातून जवळच्या शहरात येणे देखील अवघड होत आहे.

शहरातील बहुतांशी मजूर दिवाळीकरिता गेले नसल्याने, दिवाळीनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला असला, तरीदेखील शहरातील बांधकाम साईटस्‌ला मनुष्यबळाचा पुरेशा प्रमाणात पुवठा होत आहे. त्यामुळे शहरातील सुरुअसलेल्या बांधकाम साईटस्‌वर याचा कोणताही विपरित परिणाम झालेला नाही.
– काशिनाथ नखाते, अध्यक्ष,कष्टकरी संघर्ष महासंघ

दिवाळीकरिता गावी गेलेल्या कामगारांशी संपर्क झाल्यानंतर खासगी ट्रॅव्हल्सकडून तिप्पट, चौपट भाडे आकारले जात असल्याची माहिती कामगारांकडून मिळाली. शेवटी लघुउद्योगांमधील उत्पादन सुरु राहण्याकरिता अनेक उद्योजकांनी कामगारांना भाड्याची अतिरिक्‍त रक्कम देण्याची तयारी दर्शविल्यानंतर, हे कामगार शहरात परतले आहेत. मात्र, याचा उद्योजकांना आर्थिक फटकाबसला आहे.
– संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना

==============

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.