पुणे – करोना संकटाशी सामना करण्यासाठी एसटी कर्मचारी मार्च महिन्यातील 3 दिवसांचा पगार राज्य सरकारला देण्यात येणार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.
राज्यभरातील एसटी आगारांमध्ये सुमारे पस्तीस-चाळीस हजार कर्मचारी विविध पदांवर काम करत असून यामध्ये पुणे विभागातील तीन हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
दरम्यान, महामंडळाने कर्मचाऱ्यांवर कोणतीही सक्ती केली नसून कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने पगार देण्याचे मान्य केले, अशी माहिती एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. करोनामुळे देशासह राज्यात हाहाकार माजला असून करोनाग्रस्तांकरिता तसेच गरजूंकरिता आपणही काही तरी करावे, या हेतूने तीन दिवसांचा पगार देण्यात येणार असल्याचे कर्मचाऱ्यानी स्पष्ट केले.