हडपसरचे एसटी निवारा शेड मद्यपींचा अड्डा

चार महिन्यांपासून नियंत्रकाअभावी बंद; प्रवाशांना सुविधा नाहीत

हडपसर – राज्य परिवहन महामंडळाकडून हडपसर येथील दोन्ही एसटी थांब्यावर निवारा शेड उभारण्यात आले आहे. मात्र, चार महिने होऊनही निवारा शेड नियंत्रकाअभावी बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना अद्यापही येथे ऊन, वारा, पावसात थेट रस्त्यावरच उभे राहून बसची प्रतिक्षा करावी लागत आहे. तसेच, रविदर्शन येथे एका निवृत्त कर्मचाऱ्याने उभारलेले नियंत्रक केबीनही मद्यपींसाठीचा अड्डा बनले आहे. एसटी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

हडपसर येथून दररोज हजारो प्रवासी एसटीने प्रवास करीत असतात. एवढ्या मोठ्या संख्येने प्रवासी असूनही या ठिकाणी आवश्‍यक ती सुविधा एसटीकडून पुरविण्यात आलेली नाही. या ठिकाणी प्रवाशांसाठी निवारा शेड असावे, अशी मागणी अनेक गेल्या काही दिवसांपासून होत आहे. ही मागणी लक्षात घेत परिवहन महामंडळाकडून सोलापूर महामार्गावर रविदर्शन येथे तर सासवड मार्गावर सातववाडी येथे एसटी थांब्यावर निवारा शेड ठेवण्यात आलेली आहेत.

मात्र, सोलापूर महामार्गावरील शेड चार महिने होऊनही नियंत्रक नसल्याने सुरू करण्यात आलेले नाही. तर सासवड रस्त्यावरील शेड खुले असूनही त्यामध्ये आवश्‍यक सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. दोन्हीही मार्गावरील निवारा शेड म्हणजे नसून अडचण व असून खोळंबा, अशी अवस्था अनुभवास येते आहे.

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. दररोज वेगवेगळ्या वेळी येथे हजारो प्रवासी एसटीच्या प्रतीक्षेत तासन्‌तास येथे उभे असतात. अनेक वर्षे मागणी केल्यानंतर चार महिन्यापूंर्वी परिवहन मंडळाने या दोन्ही मार्गावर प्रवाशांसाठी निवारा प्रतीक्षा शेड उभारले आहे. मात्र, नियंत्रक तसेच माहितीफलक, पंखे व वीज अशा सुविधांअभावी ही निवारा शेड बंद आहेत. एसटीतील निवृत्त कर्मचारी दत्तात्रय बारगुजे यांनी निवृत्तीनंतर मिळालेल्या काही रकमेतून प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेऊन येथे काही महिन्यांपूर्वी स्वखर्चाने निवारा शेड उभारले. एसटीचे शेड खुले नसल्याने याच शेडचा उपयोग सध्या प्रवाशांना होत आहे.

तिकीट आरक्षणाची मागणी…
रविदर्शन येथील एसटी थांब्यावरून सोलापूर, लातूर, अहमदपूर भागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यासाठी या ठिकाणाहून तिकीट आरक्षणाची सोय झाल्यास प्रवाशांचा वेळ, त्रास व पैसा वाचण्यास मदत होईल. त्यामुळे प्रवाशांनी येथे तिकीट आरक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.