वल्लभनगर आगाराच्या बसला मोशी टोलनाक्यावर भरावा लागतोय ऑफलाइन टोल
पिंपरी (प्रतिनिधी) – टोलनाक्यावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यातील महामार्गांवरील टोलनाक्यांवर फास्टॅग सिस्टीम बसविण्यात आली आहे. यासाठी डिसेंबरपासून अंमलबजावणी करण्यात येणार होती. मात्र, 15 जानेवारीपर्यंत टोलनाक्यावर व सर्व वाहनांना फास्टॅग बसविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. यानुसार बहुतांश वाहनांना व टोलनाक्यावर ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, शंभर टक्के फास्टॅग बसविण्यात आलेल्या वल्लभनगर आगाराच्या बसचालकांना मोशी येथील टोलनाक्यावर मात्र ऑफलाइन टोल भरावा लागत आहे. यामुळे आगार प्रशासनाने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आता येथेल टोलनाक्यावर फास्टॅग सिस्टीम का बसविण्यात आली नाही किंवा कधी बसविणार आहेत हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दिवसेंदिवस वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे महार्गावर टोल भरण्यासाठी मोठी वाहतूक कोंडी होत होती. त्यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाच्या वतीने फास्टॅग सिस्टीम टोलनाक्यावर व दुचाकी व तीनचाकी वाहने वगळून इतर वाहनांना लावने अनिवार्य केले आहे. ही यंत्रणा डिसेंबरपासून अंमलात आणण्यात येणार होती. मात्र, बऱ्याच टोलनाक्यावर आणि वाहनांना फास्टॅग सिस्टीम बसविण्यात आली नसल्याने यास 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. यामुळे आता फास्टॅग न बसवलेल्या वाहनांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या आगाराच्या बसला फास्टॅग स्टीकर बसविण्यात आलेले आहे. तरीही आगाराच्या चालकांना मोशी येथील टोलनाक्यावर ऑफलाइन टोल भरावा लागतो. यामुळे आगारातील चालकांना टोल भरण्यासाठी रोख पैसे द्यावे लागत आहेत. याबाबत आगार प्रशासनाने नाराजी व्यक्त केली असून, सर्वच ठिकाणच्या टोलनाक्यावर फास्टॅग सिस्टीम बसविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
फास्टॅग म्हणजे काय?
टोलनाक्यावर वसूल केला जाणारा कर ऑनलाइन पद्धतीने घेतला जातो. वाहनांच्या काचावर फास्टॅग स्टिकर लावण्यात येते, त्याला टोलनाक्यावरील सेन्सर कॅमेऱ्यामार्फत स्कॅन केल्यावर वाहनधारकांच्या बॅंक खात्यातून टोल वसूल केला जातो. यास फास्टॅग पद्धत असे म्हणतात.
आगारातील जवळपास सर्वच बसेसना फास्टॅग यत्रंणा बसवण्यात आलेली आहे. यामुळे ऍनलाईन पद्धतीने टोल भरण्यात येतो. मात्र, मोशी येथील टोल नाक्यावरच फक्त ऍफलाईन टोल स्वीकारला जात असल्याने चालकांना ऑफलाईन पैसे द्यावे लागत आहेत. येथील यंत्रणा सक्रिय केल्यास फास्टॅग यत्रंणा आगारासाठी परिपुर्ण ठेरेल.
– आर.बी. वरपे, आगार प्रमुख, वल्लभनगर