6 जण गंभीर जखमी
सोलापूर: सोलापुरातील जिल्हा विकास यंत्रणेमार्फत आयोजित करण्यात आलेली रुक्मिणी जत्रा पाहण्यासाठी बार्शी पंचायत समितीमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन सोलापूरला निघालेल्या क्रुझर जीपला समोरून येणाऱ्या एसटीने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच, तर दोघांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. या अपघातात सहाजण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर सोलापुरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात सोलापूर-बार्शी रोडवरील शेळगाव-राळेरासदरम्यान शुक्रवारी सकाळी घडला.
छगन लिंबाजी काळे (वय 34), संदीप पांडुरंग घावटे (23), देवनारायण महादेव काशीद (44), संभाजी जनार्दन महिंगडे (49) आणि राकेश अरुण मोरे (32) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर शुभांगी बांडवे (35), वर्षा रामचंद्र आखाडे (35), नीलकंठ उत्तरेश्वर कदम (34), कविता भगवान चव्हाण (31), नरसिंह महादेव मांजरे (55) आणि रागिनी दिलीप मोरे (29) हे अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, एमएच-14 बीटी 3775 ही एसटी सोलापूरहुन बार्शीकडे जात असताना क्रुझर जीप बार्शीहून सोलापूरकडे निघाली होती. शेळगाव-राळेरास दरम्यान एसटीने क्रुझर जीपला जोरदार धडक दिली. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा उपचार सुरू असताना सोलापुरातील रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेले आणि जखमी झालेले बार्शी पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी आहेत. या प्रकरणी पोलीस पाटील ज्ञानदेव पाटील यांच्या फिर्यादीवरून एसटी चालक शिवाजी देशमुख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शुक्रवारी सायंकाळी सोलापुरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींची विचारपूस केली.