एसटीला मालवाहतुकीचे “बुस्टर’

3 हजार बसेसचे ट्रकमध्ये रूपांतर

राजगुरुनगर – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने राज्यात एस.टी. बसचे ट्रकमध्ये रूपांतर करून मालवाहतूक सुरू केली जाणार आहे. राज्यातील 250 एसटी बस आगारातून ही सेवा दिली जाणार आहे. याबाबतचे शासन परिपत्रक शनिवारी (दि. 23) काढण्यात आले असून त्याची तात्काळ अंमलबजावणी होणार आहे.

राज्य शासनाने राज्यभरात ठप्प झालेला एस. टी. महामंडळाचा कारभार रुळावर आणण्यासाठी मालवहातुकीचा निर्णय घेतल्यामुळे राज्यभरात जवळपास 3 हजार बसचे रूपांतर ट्रकमध्ये करून या बसेस सेवेत दाखल होणार आहे. पॅकबंद ट्रक असल्याने आगामी पावसाळ्यात शेतकरी, व्यापाऱ्यांकडून मालवहातुकीला प्राधान्य मिळणार आहे. या निर्णयाचे स्वागत व्यापारी आणि शेतकरी वर्गाकडून केले
जात आहे.

सध्या 28 रुपये किमी तर नंतर अंतिम दर ठरणार
राज्य महामंडळाच्या निर्देशानुसार एसटी बसला किलोमीटर मागे 42.4 रुपये इतका खर्च येतो. सध्या मालवहातुकीसाठी 28 रुपये प्रति किलोमीटर दर आकारून त्यावर 18 टक्‍के जीएसटी आकारण्याचे नियोजन आहे. तरी एसटी बस ट्रकची वाहतूक क्षमताही 8-9 टनाची असल्याने वाहतुकीचा दर निश्‍चित करून ही सेवा येत्या आठवड्याभरात सुरू होण्याचा अंदाज व्यक्‍त केला जात आहे.

राज्यात महामंडळाची 250 आगारे असून 600 बसस्थानक आणि 14 हजार 500 साध्या परीवर्तन बसेससह एकूण 18 हजार 500 बस गाड्या त्यांच्या ताफ्यात आहे. एकूण कर्मचारी 1 लाख 6 हजार आहेत. त्यात चालक, वाहक, फिटर आणि प्रशासकीय कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या महामंडळाच्या ताफ्यात 278 ट्रक असून त्यापैकी 153 बंदिस्त ट्रक आहेत.

ग्रामीण भागात एसटी महामंडळाच्या ट्रकद्वारे माल वाहतूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्‍यातील शेतीमाल व इतर वस्तू एसटी ट्रकद्वारे वाजवी दरात ने-आण करता येणार आहेत. व्यापारी वर्गाने, शेतकऱ्यांनी यासाठी सहकार्य करावे. साधारण ही सेवा ग्रामीणभागासह राज्यातील विविध आगारातून 8 ते 10 दिवसांत कार्यरत होणार आहे.
– रमेश हांडे, प्रमुख, राजगुरुनगर आगार

Leave A Reply

Your email address will not be published.