पुणे – राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचे पगार गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वेळेवर होत नाहीत. त्यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या महिन्यात देखील 15 तारीख आली तरी कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप झालेले नाहीत. न्यायालयाने कर्मचाऱ्यांचे पगार 10 तारखेच्या आत करण्याचे आदेश दिले आहेत. तरी देखील त्याचे पालन होत नाही. त्यामुळे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून मंगळवारी एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस बजावली आहे.
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार वेळेवर होत नसल्यामुळे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने मुंबई येथील औद्योगिक न्यायालयात ऑगस्ट 2021 मध्ये दावा दाखल केला होता. यामध्ये न्यायालयाने महिन्याच्या साधारण 10 तारखेच्या आत कामगारांचे पगार द्यावेत, असे आदेश दिले होते. पण, गेल्या काही महिन्यांपासून 10 तारीख उलटून गेली तरी पगार होत नाहीत.
त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहेत. अनेकांचे पगार वेळेवर होत नसल्यामुळे बॅंक हप्ते व इतर अनेक गोष्टींना फटका बसत आहे. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा वेळेवर पगार न करून एकप्रकारे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत आहे.
याबाबत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले, की संघटनेने दाखल केलेल्या अनियमीत वेतनाच्या दाव्यामध्ये न्यायालयाने देय तारखेस वेतन देण्याचे स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत. तरीही प्रत्येक महीन्यात कर्मचाऱ्यांना पगारासाठी आक्रोश करावा लागत आहे. यामुळे राज्यातील कर्मचारी हवालदिल झाला आहे.
पगार वेळेवर करण्यासाठी आम्ही मंत्रालयातील परिवहन व वित्त विभागातील अधीकाऱ्यांना विनंती केली. पण, पगार होत नाही म्हणून आम्ही मंगळवारी चोविस तासाच्या मुदतीची नोटीस एसटीच्या व्यवस्थापकीय संचालक यांना बजावली आहे. वेतन न झाल्यास फौजदारी अवमान याचिका आम्ही तातडीने दाखल करणार आहोत.