बुलढाणा – राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण या मुख्य मागणीसह अन्य् मागण्यासाठी संप पुकारला आहे. मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत संप चालूच राहील यावर एसटी कर्मचारी ठाम आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून संपकरी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे.
एसटी महामंडळाकडून निलंबनाच्या कारवाईचा काही संपकारी कर्मचाऱ्यांनी धसका घेतल्याचे चित्र आहे. बुलढाण्यातील संपावर असलेल्या एका एसटी कर्मचाऱ्याने निलंबनाच्या भीतीने काल विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे होता. त्या कर्मचाऱ्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
विशाल अंबलकर असे आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव असून ते बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आगारात सहाय्यक तांत्रिक पदावर कार्यरत होते. विशाल यांनी निलंबन होईल या भितीने विषारी औषध प्राशन करून काल आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनतर त्यांना अकोला येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज विशाल यांची प्राणज्योत मालावली आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. मात्र त्यांच्या मागण्या अद्यापही मान्य करण्यात आल्या नाहीत शिवाय संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबणाची कारवाई करण्याचे सुरु केले आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी याचा धसका घेतला आहे. काल रोजी दोन एसटी कर्मचाऱ्यांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.