जालना – नाशिकची घटना ताजी असताना आता जालना जिल्ह्यात एका 26 वर्षीय एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचे प्रकरणे रोजच समोर येत आहे. त्यावरून या कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यात सरकार अपयशी ठरले आहे. हे या कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवरून दिसून येत आहे.
शंकर झिने असे आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव असून जालना जिल्ह्यातील अंबड बस आगारात ते चालक कम वाहक म्हणून कार्यरत होते. शंकर यांनी पैठण तालुक्यातील चांगतपुरी फाटा चनकवाडी येथे संध्याकाळच्या सुमारास आत्महत्या केली.
शंकर यांनी नैराश्यातून व आर्थिक विवंचनेतुन हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. 2019 मध्ये ते एसटी सेवेत दाखल झाले होते. 2020 पासून त्यांनी प्रत्यक्ष सेवा द्यायला सुरुवात केली होती. या घटनेमुळे परिवहनविभागात एकच खळबळ उडाली आहे.