शैक्षणिक सहलींद्वारे महसूल वाढवण्याचा प्रयत्न : विभागीयस्तरावर अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार
पिंपरी – एकेकाळी शैक्षणिक सहलींसाठी केवळ एसटी महामंडळाच्या बस वापरल्या जात होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये शैक्षणिक संस्थांनी महामंडळाच्या बसकडे दुर्लक्ष केल्यामुळे शैक्षणिक सहलींद्वारे येणारा महसूल मोठ्या प्रमाणात घटला आहे. हा महसूल वाढविण्यासाठी महामंडळाच्या प्रशासनाने कंबर कसली असून विभागस्तरावर अधिकारी नियुक्त करून शैक्षणिक सहलींना प्रोत्साहन दिले जाणार आहे. विशेष म्हणजे या सहलींसाठी जेवढ्या बस शाळांकडून मागणी केल्या जातील तेवढ्या उपलब्ध करून देण्याचाही महामंडळाने निर्णय घेतला आहे.
राज्यभरातील शैक्षणिक संस्थांकडून दरवर्षी सहली काढल्या जातात. सुरक्षित प्रवास म्हणून एसटीच्या बसेसना मोठी मागणी असायची. मात्र गेल्या काही वर्षांत एस.टी. महामंडळाकडून जुन्या, खराब उपलब्ध होणाऱ्या बसेस, मागणी एवढ्या बसेसची उपलब्धता न होणे, सहली दरम्यान बसेस बंद पडणे यासह अनेक अडचणी या बसच्या होत असल्याने महामंडळाच्या बसऐवजी खासगी बसकडे शैक्षणिक संस्थांचा ओढा वाढल्याने महामंडळाचा महसूल घटला होता.
आपल्या हक्काचे उत्पन्न खासगी बसधारकांनी त्यांच्याकडे वळविल्यानंतर उशिराने जागे झालेल्या एस.टी. महामंडळाने आता शैक्षणिक संस्थांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शैक्षणिक सहलीला प्रोत्साहन देण्यासाठी विभागीय स्तरावर अधिकारी, पर्यवेक्षक, पालक अधिकारी, यांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच, स्थानिक आगारांनी आपल्या परिसरातील शैक्षणिक संस्थांसोबत सौहार्दपूर्ण वातावरण तयार करून जास्ती-जास्त शैक्षणिक सहलीसाठी एसटीच्या बस वापरण्यासाठी या संस्थांना प्रवृत्त करावे, अशा सूचना पत्रकाद्वारे करण्यात आल्या आहेत.
शैक्षणिक सहलीसाठी प्रासंगिक करारावर मागणी एवढ्या तसेच चांगल्या दर्जाच्या बसेस उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश आगारांना दिले आहेत. बसेस मिळण्यासाठी ज्या जाचक अटी आहेत, त्या कमी केल्या जाणार आहेत. शैक्षणिक सहलीसाठी एसटीकडून 33 टक्केच तिकीट आकारणी केली जाते. तर, 67 टक्के सवलत दिली जाते. याचा जास्तीत-जास्त फायदा विद्यार्थांना मिळावा हा देखील हेतूने या प्रयत्नांमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रशासनाकडून सुरू असलेल्या या विशेष नियोजनामुळे किती शैक्षणिक संस्था एसटीकडे आकर्षित होतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शैक्षणिक सहलीसाठी एस.टी. प्रशासन कधीही गाड्या कमी पडू देत नाही. सुरक्षित, सवलतीने व सोयी-सुविधायुक्त प्रवासासाठी शैक्षणिक संस्थांनी एसटीचा जास्तीत-जास्त वापर करावा व एस. टी. प्रशासनाला सहकार्य करावे.
– पल्लवी पाटील, स्थानक प्रमुख, वल्लभनगर