नगर – राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही नगर विभागातर्फे 11 ते 25 जानेवार दरम्यान सुरक्षितता मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेदरम्यान चालकांचे प्रबोधन, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी, गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्ती अशा अनेक बाबींवर भर दिला जाणार आहे.
नगर विभागातर्फे प्रवाशांमध्ये मोहिमेदरम्यान सुरक्षित प्रवासाबद्दल विश्वास वृद्धिंगत करणे, तसेच राज्य परिवहन कर्मचाऱ्यांमध्ये वाहतुकीच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे. सुरक्षित वाहतुकीसाठी घालून दिलेल्या कार्यपद्धती पाळण्यावर भर देण्याबाबत, तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना अपघात होणार नाहीत याबाबत योग्य ती काळाजी सदैव घेणे हा या सुरक्षितता मोहिमेचा उद्देश आहे.
दररोज लाखो प्रवाशांना दळणवळणाची सुरक्षित सेवा देणारी एसटी महाराष्ट्राची लोकवाहिनी बनली आहे. गेल्या 71 वर्षात अविरत आणि सुरक्षित सेवेतून प्रवाशांच्या मनात एसटीबद्दल विश्वासार्हततेची भावना लालपरीने निर्माण केली आहे. या विश्वासाला बळकटी देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळामध्ये ही सुरक्षितता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला.
सध्या महाराष्ट्रात एसटीमध्ये सुमारे 34 हजार चालक कार्यरत आहेत. अपघाताची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने एसटीने चालकांसाठी वेळोवेळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जात आहे. अपघात विरहित सेवा बजावणाऱ्या चालकांना रोख बक्षिसे देऊन राष्ट्रीय सणाच्या दिवशी गौरवण्याचाही उपक्रम राज्य परिवहन महामंडळाने सुरु केला आहे.
चालकांना सुरक्षित प्रवासाचे महत्व पटवून देण्याबरोबरच त्यांचे मानसिक संतुलन सुदृढ करण्याच्या दृष्टीने आगार पातळीवर समुपदेशनही करण्यात येत आहे. 11 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधीत विभागातील सर्व आगारांमध्ये चालक-वाहकांची आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासह ताणतणाव व्यवस्थापन, व्यसनमुक्ती, इत्यादी विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करून कर्मचाऱ्यांना प्रबोधन करण्यात येणार आहे.
सुरक्षित सेवेच्या माध्यमातून प्रवाशांच्या मनात एसटीबद्दल विश्वासार्हतेची भावना निर्माण झाली आहे. या विश्वासाला बळकटी देण्याच्या उद्देशाने एस. टी. महामंडळामध्ये दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये सुरक्षितता मोहीम राबविण्यात येते. यामध्ये चालकांना सुरक्षित प्रवासाचे महत्व पटवुन देण्यात येणार आहे. त्यांचे आरोग्य तपासणी बरोबरच समुपदेशनही करण्यात येणार आहे.
विजय गीते, विभागीय नियंत्रक, प्रादेशिक परिवहन महामंडळ